श्रीरामपूर प्रतिनिधी -आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर तालुक्यातील मुदत संपलेल्या तसेच सन २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या २९ ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही प्रक्रिया १० ते १२ जूनदरम्यान संबंधित ग्रामपंचायतींमध्ये आयोजित विशेष ग्रामसभांमधून पार पाडण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी दिली.
सदस्य पदांसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग तसेच महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया नियोजित करण्यात आली आहे. आरक्षण सोडत पारदर्शक आणि नियमबद्ध पद्धतीने पार पडावी यासाठी महसूल, ग्रामविकास व पंचायत प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक ग्रामसभेसाठी स्वतंत्र अध्यासी अधिकारी व पर्यवेक्षक नेमण्यात आले असून संपूर्ण प्रक्रियेवर त्यांचे नियंत्रण राहणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करून आरक्षण निश्चितीची कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. सोडत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ग्रामसभेचे इतिवृत्त आणि अहवाल विहित कालावधीत तहसील कार्यालयाकडे सादर करण्यात येणार आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकांपूर्वी होणाऱ्या या आरक्षण सोडतीमुळे विविध प्रभागांतील निवडणुकीचे समीकरण स्पष्ट होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार, स्थानिक राजकीय गट आणि ग्रामस्थांचे लक्ष या प्रक्रियेकडे लागले आहे. संपूर्ण प्रक्रिया खुली, निष्पक्ष आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने सर्व आवश्यक तयारी पूर्ण केल्याचे तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी सांगितले.

0 टिप्पण्या