आळंदी : चर्होली खुर्द येथील मुख्य बाह्यवळण रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. काही महिन्यांपूर्वीच पुलाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असले, तरी पुलालगतच्या या महत्त्वाच्या रस्त्यावरील खड्ड्यांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
सध्या सुरू असलेल्या पावसामुळे खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून, वाहनचालकांना खड्ड्यांची खोली लक्षात न आल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. रस्त्यावर चिखलाचे प्रमाणही वाढल्याने विशेषतः दुचाकीस्वारांना मोठी कसरत करावी लागत आहे. अनेक ठिकाणी वाहने घसरत असल्याच्या घटना घडत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याशिवाय, साचलेल्या पाण्यातून वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे पादचाऱ्यांच्या अंगावर चिखल व घाणेरडे पाणी उडत असल्याने स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रोजच्या प्रवासात नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगण्यात येत आहे.
खड्डेमय रस्त्यावरून वारंवार प्रवास केल्याने दुचाकीस्वारांना पाठीचे व मणक्याचे त्रास जाणवत असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. तसेच खड्डे टाळण्याच्या प्रयत्नात समोरासमोर वाहने येऊन अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. चारचाकी वाहनांचे टायर व इतर सुटे भाग खराब होत असून अनेक वाहने रस्त्यातच बंद पडत असल्याने चालकांना अतिरिक्त खर्चाला सामोरे जावे लागत आहे.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपला असून या मार्गावरून वारकरी व भाविकांची मोठी वर्दळ अपेक्षित आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाने कोणतीही दुर्घटना होण्याची वाट न पाहता तातडीने आणि दर्जेदार पद्धतीने रस्त्याची दुरुस्ती करून खड्डे बुजवावेत, अशी मागणी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष नंदकुमार वडगावकर यांनी प्रशासनाकडे केली आहे.

0 टिप्पण्या