मान्सूनची पुन्हा ‘तारीख पे तारीख’; पेरणीसाठी अजूनही प्रतीक्षा आवश्यक!


अहिल्यानगर | प्रतिनिधी अहिल्यानगर जिल्ह्यात मान्सूनने हजेरी लावली असली, तरी त्यानंतरच्या उघडीप आणि कडक उन्हामुळे खरीप हंगाम पुन्हा अनिश्चिततेच्या छायेत गेला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत झालेला पाऊस विखुरलेला, खंडित आणि अपुरा असल्याने बहुतांश भागात पेरणीसाठी आवश्यक ओलावा निर्माण झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणी न करता आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी, असा सल्ला जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता उत्तमराव निर्मळ यांनी दिला आहे.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ जूनपासून २० जूनपर्यंत तळकोकणात स्थिरावलेला मान्सून २३ जून रोजी मुंबई, कोकण आणि सह्याद्री घाटमाथ्यावर दाखल झाला. मात्र, अपेक्षित जोर नसल्याने कोकण आणि घाटमाथ्यावरही समाधानकारक पाऊस झाला नाही. स्थानिक वातावरणामुळे अहिल्यानगरसह काही मोजक्या भागांत मुसळधार सरी कोसळल्या; परंतु त्यानंतरच्या उघडीपमुळे त्या पावसाचा पेरणीसाठी फारसा उपयोग झाला नाही. काही भागात तर मान्सूनचे अद्यापही दर्शन झालेले नाही.

२५ जूपर्यंत जिल्ह्यातील बहुतांश भागात सरासरी पावसाची तूट सुमारे ६२ टक्के असून काही ठिकाणी ती १०० टक्क्यांपर्यंत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सध्या अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात मान्सूनला बळ देणारी कोणतीही प्रभावी हवामान प्रणाली सक्रिय नसल्याने पावसाचा जोर कमी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय एमजेओ (MJO) आफ्रिकेजवळील फेज-१ मध्ये असल्याने त्याचा मान्सूनला अपेक्षित लाभ होत नाही. आयओडी (हिंदी महासागर द्विध्रुव स्थिती) तटस्थ आहे. दुसरीकडे जपान व फिलीपिन्स परिसरातील ‘मेखला’ या शक्तिशाली चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरातील बाष्पयुक्त वारे त्या दिशेने खेचले जात असून सोमालिया जेटही कमकुवत झाला आहे. परिणामी अरबी समुद्रातून येणाऱ्या दमट वाऱ्यांचा वेग मंदावला आहे. अल-निनोची वाढती तीव्रताही मान्सूनसाठी प्रतिकूल ठरत असल्याचे निर्मळ यांनी सांगितले.

२ जुलैपर्यंत खंडित पावसाची शक्यता

निर्मळ यांच्या अंदाजानुसार, २ जुलैपर्यंत अहिल्यानगरसह पर्जन्यछायेतील भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा, विखुरलेला आणि खंडित पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी स्थानिक वातावरणामुळे जोरदार सरी कोसळू शकतात; मात्र सर्वदूर पावसाची अपेक्षा नाही. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होऊन राज्यात सर्वसाधारण पावसाला सुरुवात होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

उत्तमराव निर्मळ म्हणाले...

"सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी घाईने पेरणी करू नये. जमिनीत किमान पाच ते सहा इंच ओलावा निर्माण झाल्यानंतरच पेरणी करणे योग्य ठरेल. अन्यथा पाऊस पुन्हा खंडित झाल्यास दुबार पेरणीचे मोठे संकट ओढवू शकते. ज्यांच्याकडे सिंचनाची पर्यायी व्यवस्था नाही, त्यांनी विशेष काळजी घ्यावी." – उत्तमराव निर्मळ, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या