शिर्डीत दोन लाखांचे निकृष्ट पेढे जप्त; तीन उत्पादन केंद्रांवर कारवाई अन्न व औषध प्रशासन, वैध मापन व डेअरी विभागाची संयुक्त धाड




शिर्डी  :  प्रतिनिधी  साईबाबा प्रसादाच्या नावाखाली विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांवर अन्न व औषध प्रशासन, वैध मापन विभाग, डेअरी विकास विभाग आणि स्थानिक प्रशासनाने संयुक्त कारवाई करत सुमारे साडेसहाशे किलो वजनाचे अंदाजे दोन लाख रुपये किमतीचे पेढे जप्त करून नष्ट केले. या कारवाईमुळे शिर्डीतील मिठाई व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

साईबाबा दर्शनासाठी दररोज हजारो भाविक शिर्डीत येत असल्याने पेढे व मिठाई उत्पादन करणाऱ्या काही आस्थापनांकडून अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार विशेष तपासणी मोहीम राबवून शिर्डीतील काही मिठाई विक्री केंद्रे तसेच निमगाव निघोज परिसरातील तीन पेढा उत्पादन कारखान्यांवर धाड टाकण्यात आली.

तपासणीदरम्यान मोठ्या प्रमाणात पेढे, दूधजन्य पदार्थ व अन्य साहित्य जप्त करण्यात आले. उत्पादन तारीख, कालबाह्यता दिनांक, पॅकेजिंग मानके, वजनातील तफावत तसेच काही वजनकाटे प्रमाणित नसल्याचे आढळून आले. संबंधित साहित्याचा पंचनामा करून माल अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात आणण्यात आला. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कचरा डेपो येथे खड्डा खोदून जेसीबीच्या सहाय्याने तो नष्ट करण्यात आला.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्राप्त तक्रारींची दखल घेत ही कारवाई करण्यात आली असून जप्त केलेल्या नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी केली जाणार आहे. अहवालानुसार संबंधितांवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यान्वये कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

दूध भेसळ प्रतिबंधक समितीचे अध्यक्ष तथा अप्पर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार झालेल्या या कारवाईत पोलीस प्रशासन, नगरपालिका, अन्न व औषध प्रशासन, वैध मापन विभाग व डेअरी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. भाविकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांविरोधात अशा कारवाया यापुढेही सुरू राहतील, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या