राहुरी प्रतिनिधी :- तालुक्यातील डिग्रस ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा ग्रामस्थांनी विविध प्रश्नांवर केलेल्या भडिमारामुळे चांगलीच गाजली. अनेक विषयांवर तीव्र चर्चा, तक्रारी आणि तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष निवडीवरून झालेल्या वादामुळे ग्रामसभा वादळी ठरली.
ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच रेणुका गावडे होत्या. उपसरपंच रावसाहेब पवार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
सभेत बारागाव नांदूर योजनेअंतर्गत नवीन कामांचे प्रस्ताव, प्रधानमंत्री आवास योजना, घरपट्टी, पाणीपट्टी, १५ वा वित्त आयोग, तंटामुक्त समितीची स्थापना तसेच शासकीय योजनांचा आढावा या विषयांवर चर्चा करण्यात आली. मात्र चर्चेदरम्यान ग्रामस्थांनी अपूर्ण विकासकामे, घरकुल योजना, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा आणि विविध तक्रारींवर पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले.
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामकाजाबाबत उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे ग्रामस्थांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. मात्र समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त करत आरोग्य सुविधांबाबत संताप व्यक्त केला. तसेच पूर्वी मंजूर झालेल्या घरकुलांचे लाभार्थी सध्या वास्तव्यास आहेत का, याची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली.
रामवाडी, शोलेवाडी, भीमनगर आणि कोयबामाळ येथील नागरिकांनीही विविध समस्या मांडत ग्रामपंचायत प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त केली.
सभेचा मुख्य विषय असलेल्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदासाठी तब्बल १२ इच्छुकांनी नावे दाखल केली. अध्यक्ष निवडीबाबत एकमत न झाल्याने अखेर १५ ऑगस्ट रोजी मतदान घेऊन अध्यक्षाची निवड करावी, अशी ग्रामस्थांनी मागणी केली. त्यानंतर ग्रामसभा आटोपती घेण्यात आली.
विशेष म्हणजे, यापूर्वीच्या ग्रामसभांमध्ये कोरम पूर्ण होत नसताना यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित राहिल्याने गावात याची विशेष चर्चा रंगली.

0 टिप्पण्या