राहुरी प्रतिनिधी - एन.एच.ए.आय. अर्थात नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया कडून आलेल्या मोजणीदार अधिकारी, कर्मचारी यांना राहुरी तालुक्यातील खडांबे आणि सडे येथील शेतकऱ्यांनी शेत-शिवारात आले असता प्रकल्पग्रस्तांनी तात्काळ ही मोजणी थांबवली व अधिकाऱ्यांना मोजणी करण्यापासून कडाडून विरोध केला. मोजणीदार पथक शेतात आले असताना या ठिकाणी पाऊस झाल्याने सर्वत्र चिखल झाला आहे.तसेच संबंधित खाजगी संस्थेने प्रकल्पातील सीमांकनही केले नसल्याचा आरोप केला आहे. तसेच संबंधित अर्जदार व प्रकल्पग्रस्तांच्या ज्या समस्या आहेत त्याचे निवारण ही केलेले नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांचे नुकसानीचा मोबदला व अन्य समस्यांचे निराकरण झाल्याशिवाय सीमांकन करू देणार नाही. असा आक्रमक पवित्रा राहुरी तालुक्यातील खडांबे, सडे येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची घेतला असून एकजुट कायम असल्याने संबंधित मोजणीदार पथक हात हलवत परतले असल्याचे चित्र दिसून आले.
राहुरी तालुक्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांकडून मोबदल्याच्या प्रश्नामुळे विरोध कायम असल्याचे चित्र दिसत आहे .भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एन.एच.ए.आय.) ने सुरत - चेन्नई या ग्रीनफिल्ड एक्सप्रेस ची सूचना २०१३ मध्ये जारी केली होती. त्यानंतर मोठा कालखंड होत विषय रखडला गेला या महामार्गावरील जमिनीवर एन.एच.ए. आय. चा बोजा पडल्याने शेतकरी हैराण झालेले असताना मोबदला जाहीर न झाल्यामुळे शेतकऱ्यांचा विरोध कायम असून जमिनीचा कोणताही व्यवहार खरेदी अथवा विक्री देखील होत नाहीय. म्हणून एन.एच.ए. आय. च्या अधिकाऱ्यांसमोर राहुरी तालुक्यातील खडांबे खुर्द, बुद्रुक, सडे, वांबोरी येथील शेतकऱ्यांचा केंद्रशासनाच्या विरोधात प्रचंड जनआक्रोशाला सामोरे जावे लागले.
असे असताना केंद्र सरकारने या सुरत-चेन्नई एक्सप्रेसवे करिता १९ हजार कोटी रुपयांची मंजुरी दिली. त्यानंतर हालचाली वेगाने वाढत नुकत्याच नाशिक - चेन्नई एक्सप्रेस हायवे मधील नाशिक ते अक्कलकोट या टप्प्याचे निविदा मागवण्यात आल्याचे सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले. हा ग्रीनफिल्ड एक्सप्रेस हायवे नाशिक ते अहिल्यानगर पहिला टप्पा आणि अहिल्यानगर ते अक्कलकोट अशा दोन टप्प्यात २७४ किलोमीटर कामाच्या निविदा मागवण्यात आल्याचे प्रसिद्ध झाले. दोन टप्प्यासाठी दोन स्वतंत्र निविदा या एप्रिलमध्ये मंजूर प्रक्रिया झाली , भूसंपादनाचा मार्ग मोकळा होत आहे.
मात्र राहुरीतील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा मोबदला जाहीर न झाल्याने विरोध कायम आहे. नाशिक - अक्कलकोट एक्सप्रेस हायवे झाल्यानंतर दहा तासांचा प्रवास अवघ्या चार तासांवर येणार आहे. सध्या नगर मनमाड राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड वाहतुकीचा ताण पडत असून २०२७ च्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी केंद्र सरकारकडून महामार्ग व रेल्वे मार्ग यांच्या विकास कामांचा धडाका सुरू आहे.
"शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच सुरत हैदराबाद या राष्ट्रीय ग्रीनफिल्ड महामार्गाची सविस्तर,लिखीत स्वरुपात माहिती द्यावी, गाई गोठा, विहिरी,कूपनलिका,आणि घरे तसेच जमिनीचा मोबदला थेट वाटाघाटीने देण्यात यावा अन्यथा लोकशाहीच्या मार्गाने कडाडून विरोध करून जमिन मोजणी प्रक्रियेचे काम करू दिले जाणार नाही. कारण यापूर्वी मुळा ,जायकवाडी धरण, कृषी विद्यापीठ, डिझेल पाईप लाईन, आदी. प्रकल्पात माझे यापूर्वी भूसंपादन झालेले आहे. "
- सागर धोंडे
प्रकल्पबाधित शेतकरी, सडे

0 टिप्पण्या