राजकारणापलीकडे पाण्याची काळजी घेणे गरजेचे - माजी मंत्री बाळासाहेब थोरात

 



मा.मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते निळवंडे पाण्याचे चिंचोली गुरव येथे जलपूजन

संगमनेर-  चिंचोली गुरव येथे पाणी परिषद झाली आणि त्यातून निळवंडे सुरू झाले. धरण व कालव्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करून ते पूर्ण केले. आता पाणी आले आहे. कालव्यांना कॉंक्रिटीकरण केल्याने पाणी पुढे वाहून चालले आहे. निळवंडे चे हक्काचे पाणी शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे. सत्तेत असेल त्याने आपल्या तालुक्याचे पाणी जपणे आणि पाणी वाढवणे ही जबाबदारी आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाण्याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

चिंचोली गुरव येथे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून पाईप टाकून भरवण्यात आलेल्या बंधाऱ्याचे जलपूजन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन पांडुरंग पा. घुले, ज्येष्ठ संचालक संपतराव गोडगे, तालुकाध्यक्ष अजय फटांगरे,माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे, रामहरी कातोरे, गुलाबराव देशमुख, रावसाहेब दुबे, माजी सभापती अविनाश सोनवणे, राजहंस ट्रान्सपोर्टचे अध्यक्ष हौशीराम सोनवणे, शेतकी संघाचे संचालक सचिन दिघे ,सरपंच विलास सोनवणे, वाल्मीक गोडगे, विनोद गोडगे, विजय गोडगे ,विलास मास्तर सोनवणे, संदेश गोडगे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजीमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, निळवंडे चे पाणी दुष्काळी भागात शेतकऱ्याला देणे हे आपले स्वप्न होते. या पाण्यापासून कुणीही वंचित राहणार नाही. असा विचार करून आपण मध्य प्रदेश येथील मोहनपुराच्या धर्तीवर योजना तयार केली होती. कालव्याच्या वरच्या बाजूलाही पाणी जाईल यासाठी नियोजन केले. पण सध्या निळवंडे कालव्याला काँक्रिटीकरण केल्याने पाणी कुठे चालले आहे? सत्तेत येईल त्याने आपल्या तालुक्याच्या हक्काचे पाणी जपणे आणि वाढवणे गरजेचे असते. लढाई पाण्याची असेल तर राजकारणा पलीकडे जाऊन काळजी घेतली पाहिजे. पाणी जपणे आणि वाढवणे ही आपली जबाबदारी आहे.

पाण्यासाठी आपण मोठा संघर्ष केला आहे. पाणी हा जीवनाचा विषय आहे. पाणी आणि वीज या विषयावर बोलले पाहिजे .त्यासाठी भांडले पाहिजे .आपल्या सत्तेच्या काळा तालुक्यात सर्वाधिक वीज उपकेंद्र झाली. शेतकऱ्यांना पिक विमा मिळवण्यासाठी काळजी घ्यावी लागते. मात्र पाणी वीज आणि पीक विमा या विषयावर सध्याचे लोकप्रतिनिधी बोलत नाही हे दुर्दैव असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. निळवंडे धरणाच्या पाण्याने जितका भाग जास्तीत जास्त ओलिताखाली आणता येईल तो आपला प्रयत्न आहे. नान्नज, निमोण, पारेगाव या भागांसाठी उपसा जलसिंचन योजना आपण मंजूर केल्या होत्या. मात्र त्याला स्थगिती देण्यात आली आहे.

सत्ता मिळवण्यासाठी काहीही करणारा भाजप हा पक्ष असून धर्म केवळ सांगण्यासाठी असतो. मात्र ते धर्माचे राजकारण करत आहे. भावी पिढीला लोकशाही पाहायला मिळेल की नाही याबाबतची चिंता ही त्यांनी व्यक्त करून सध्याचे राजकारण चुकीचे सुरू आहे. ते दुरुस्त करण्याची जबाबदारी जनतेची असल्याचे ते म्हणाले.

तर संपतराव गोडगे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने विविध गावांसाठी पाईप दिले आहेत पाईप टाकल्याने गावांमध्ये पाणी आले आहे. तळेगाव गटातील देवकवठे, करुले लोहारे वडझडी यांस विविध गावांमध्ये कारखान्याने पाईप दिल्याने पाणी आले आहे यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी कारखान्याची यंत्रणा सातत्याने कार्यरत असल्याचे ते म्हणाले. यावेळी संपतराव गोडगे, महेंद्र गोडगे, अविनाश सोनवणे सरपंच विलास सोनवणे यांनीही मनोगत व्यक्त केली.
यावेळी चिंचोली गुरव व परिसरातील कार्यकर्ते युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास मास्तर सोनवणे यांनी केले तर वाल्मीक गोडगे यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या