संगमनेर : -शहरातील एका कॉलनी परिसरात सुरू असलेल्या कथित अवैध गोवंश कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी पहाटे धाडसी छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत तीन आरोपीना अटक करण्यात आली असून, तब्बल १५ लाख ८५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणातील सहा आरोपी फरार असून त्यांचा पोलीसांकडून शोध सुरू आहे.
पोलीस अधीक्षक मुम्मका एम सुदर्शन यांच्या आदेशानुसार आणि अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या सुचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि महादेव गुट्टे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
गुप्त माहितीच्या आधारे पथकाने सरकार लॉन्सजवळील काटवण परिसरात पहाटे छापा टाकला. त्यावेळी काही जण गोवंशीय जनावरांची कत्तल करत असल्याचे आढळून आले. पोलिसांची चाहूल लागताच काही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
अब्दुलनूर जब्बार कुरेशी (वय २०), इमाम हुसेन शेख (वय २८),आणि अहमद फारून शहा (वय ३२), सर्वजण,रा. संगमनेर ) या तिघांना जेरबंद केले. या चौकशी दरम्यान अवैध कत्तल प्रकरणातील आणखी सहा साथीदारांची नावे समोर आली असून ते फरार आहेत. त्या आरोपी कडून ३१०० किलो गोमांस - किंमत १९.३० लाख,एक पिकअप वाहन किंमत ₹६ लाख,चार मोबाईल फोन किंमत ₹५५ हजार,सुरा, कुऱ्हाड व इतर साहित्य, असा ₹१५,८५,५०० एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ तसेच प्राणी संरक्षण अधिनियमातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करत आहेत.
या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी सहभाग घेतला असून, फरार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.
.jpg)
0 टिप्पण्या