कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर अपघात; पंढरपूरहून परतणारे बोटा येथील ५ भाविक गंभीर




घारगाव :- कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर जुन्नर तालुक्यातील गुळंजवाडी गावच्या हद्दीत आज, बुधवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास दोन वाहनांची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. पंढरपूर येथे विठ्ठलाचे दर्शन घेऊन अहिल्यानगर जिल्ह्यातील बोटा (ता. संगमनेर) या आपल्या गावी कार क्रमांक एमएच १४ एनडी ३३७८ परतत असलेल्या भाविकांच्या वाहनाला समोरून येणाऱ्या दुसऱ्या एमएच २४ बीडब्लू २८६२ या क्रमांकाच्या पीकअप वाहनाने जोरदार धडक दिली.
हा अपघात इतका तीव्र होता  की दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. पिकअप वाहनांचा वेग अधिक असल्याने कारमधील प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले. या दुर्घटनेत जिजाभाऊ दत्तात्रय शेळके, गाडीचे चालक शिवाजी शांताराम मेंगाळ, बाळासाहेब भागाजी मुसळे, सुभाष तुकाराम शेळके आणि आनंदा रामभाऊ मधे (सर्व रा. बोटा, ता. संगमनेर) हे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताचा आवाज ऐकून गुळंजवाडी परिसरातील ग्रामस्थ आणि महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे अपघातग्रस्त वाहनात अडकलेल्या जखमींना तातडीने बाहेर काढण्यात आले. रुग्णवाहिकेच्या साहाय्याने सर्व पाचही जखमींना आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच आळेफाटा पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या अपघाताचा पुढील तपास आळेफाटा पोलीस करत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या