बारा बाभळीत एकाची चाकूने भोसकून हत्या : दुसरा गंभीर जखमी

अहिल्यानगर: नगर पाथर्डी रस्त्यावरील बाराबाभळी परिसरात हॉटेल शौर्य या ठिकाणी बिलावरून झालेल्या वादातून एका तरुणाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली . तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. सागर गंगाधर धोत्रे (वय 32 ) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी घटनेनंतर फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

 या घटनेची पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, निलेश धुराजी गायकवाड (रा. आलमगीर ,भिंगार) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, फिर्यादी व त्याचा मित्र सागर धोत्रे आणि निलेश मधु चावरे यांच्यासोबत हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर निलेश चावरे यांनी बिल भरले. आणि सर्वजण काऊंटर जवळ उभे राहिले .त्याचवेळी तेथे भिंगार मधील एक अल्पवयीन मुलगा हॉटेल मॅनेजर सोबत पैशाच्या कारणावरून वाद घालत होता. हा वाद मिटविण्यासाठी सागर धोत्रे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मित्रा कशाला वाद करतो .त्यांचे पैसे देऊन टाक .असे सागर म्हणाला, याचा राग धरून त्या अल्पवयीन मुलाने सागरला शिवीगाळ करत त्याच्याशी वाद घातला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर त्या अल्पवयीन मुलाने स्वतः जवळील चाकू काढून आधी निलेश चावरे यांच्या गळ्यावर वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याने त्या चाकूने सागर धोत्रे यांच्या छातीत भोकसले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला सागर जागेवर बेशुद्ध झाला. जखमी निलेश चावरे याला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तर सागर धोत्रे याला जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला उपचारा पूर्वीच मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे ,सहा. पो. नि. तेजश्री थोरात यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी पोलिसांनी एका सोळा वर्षीय अल्पवयीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस अल्पवयीन आरोपीचा शोध घेत आहेत. नगर पाथर्डी रस्त्यावरील बाराबाभळी शिवारात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या