श्रीगोंद्यात मध्यरात्री एलसीबीची धडक; मुंढेकरवाडीत तब्बल २९ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त : तिघांना अटक; तिघे फरार


दोन आलिशान कार, लाखोंचा पानमसाला, तंबाखू, रोकड व मोबाईल हस्तगत

श्रीगोंदा, प्रतिनिधी :श्रीगोंदा तालुक्यात प्रतिबंधित गुटख्याच्या काळ्या व्यवसायाला मोठे जाळे असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मंगळवारी मध्यरात्री मुंढेकरवाडी येथे धडक कारवाई करत तब्बल 28 लाख 88 हजार 330 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू, दोन चारचाकी वाहने, रोकड व मोबाईल जप्त केले. यावेळी पोलिसांनी तिघा जणांना अटक केली असून तिघे जण फरार झाले आहेत. या कारवाईमुळे गुटखा माफियांचे धाबे दणाणले असून श्रीगोंदा तालुक्यातील अवैध गुटखा रॅकेट पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. 

  अहिल्यानगर एलसीबीला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे 30 जून रोजी पहाटे 12.45 वाजण्याच्या सुमारास मुंढेकरवाडी येथील अमोल रामदास जाधव यांच्या घरासमोर छापा टाकण्यात आला. त्यावेळी आरोपी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेला विमल केसरयुक्त पानमसाला, व्ही-1 सुगंधित तंबाखू आणि आरएमडी पानमसाला वाहनांमध्ये भरत असल्याचे पोलिसांना आढळून आले.कारवाईदरम्यान स्विफ्ट डिझायर (MH-05 DS-1724) आणि ह्युंडाई अल्काझार (MH-42 BE-6316) या दोन वाहनांमध्ये तसेच घरासमोर ठेवलेल्या पोत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूचा साठा आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळीच दोन्ही वाहने ताब्यात घेतली.या कारवाईत अमोल रामदास जाधव (मुंढेकरवाडी), अनिल रतन कुरुमकर (मुंढेकरवाडी) आणि फरहान रेहमान बेपारी (बुरुडगल्ली, श्रीगोंदा) यांना अटक करण्यात आली. तर दीपक लोखंडे, शोएब राजू तांबोळी आणि 'अफू' (पूर्ण नाव अज्ञात) हे आरोपी फरार झाले असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. तसेच माजीद नावाच्या व्यक्तीचाही तपास सुरू आहे.यामध्ये पोलिसांनी 80 पोती प्रतिबंधित विमल केसरयुक्त पानमसाला,80 पोती व्ही-1 सुगंधित तंबाखू,240 पुडे आरएमडी पानमसाला,दोन चारचाकी वाहने,आरोपींकडील रोख रक्कम,विवो आणि ओप्पो कंपनीचे मोबाईल फोन असा एकूण 28,88,330 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात  भारतीय न्याय संहिता कलम 123, 223, 274, 275, 3(5) तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 च्या कलम 59 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पो. कॉ. मनोज मोहन साखरे  यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे करीत आहेत. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे यांच्या पथकाने केली.
तालुक्यात गुटखा माफिया पुन्हा सक्रिय?
मुंढेकरवाडीसारख्या ग्रामीण भागात इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटख्याचा साठा आढळल्याने या अवैध व्यवसायात मागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. एवढा मोठा साठा नेमका कुठून आला, तो कोणत्या जिल्ह्यात पुरवठा होणार होता आणि या साखळीतील मुख्य सूत्रधार कोण, याचा तपास आता पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरणार आहे.
याकारवाईमध्ये ठळक बाबी
मध्यरात्री एलसीबीची धडक कारवाई,28.88 लाखांचा प्रतिबंधित गुटखा, तंबाखू व वाहने जप्त,तीघांना अटक, तिघे फरार,गुटखा तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा संशय,एलसीबीच्या कारवाईने गुटखा माफियांचे धाबे दणाणले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या