आर्थिक गैरव्यवहारावर नागेबाबा संस्थेचा कठोर निर्णय; दोषींवर गुन्हा, खातेदारांना नुकसानभरपाई





सोनई  / घोडेगाव -श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लि., अहिल्यानगरच्या घोडेगाव शाखेतील काही तत्कालीन कर्मचाऱ्यांकडून आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे अंतर्गत तपासणीदरम्यान उघडकीस आल्यानंतर संस्थेने स्वतः पुढाकार घेत सोनई पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून संस्थेने दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
संस्थेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सभासदांनी उपलब्ध करून दिलेल्या पुराव्यांच्या आधारे तसेच अंतर्गत लेखापरीक्षणादरम्यान करण्यात आलेल्या तपासणीत घोडेगाव शाखेतील तत्कालीन कर्मचारी दिलीप रमेश पातारे, किशोर बाबासाहेब खरपुडे, शुभम बाबासाहेब रासकर, सौरभ रामनाथ दहितुले आणि रेणुका बाळासाहेब चौरे यांच्या आर्थिक गैरव्यवहाराची बाब निदर्शनास आली. यानंतर कोणतीही बाब लपवून न ठेवता संस्थेने सर्व आवश्यक पुरावे संकलित करून सोनई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.याचा पुढील तपास सोनई पोलीस ठाण्याचे सपोनि अनिल मोरे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस उपनिरीक्षक किशोर जाधव करत आहेत.

या गैरव्यवहारामुळे ज्या खातेदारांचे आर्थिक नुकसान झाले होते, त्या सर्वांची रक्कम संस्थेने स्वतः परत केली असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे कोणत्याही सभासदाचे आर्थिक नुकसान होणार नाही, याची संपूर्ण जबाबदारी संस्थेने स्वीकारली आहे.
संस्था सध्या पोलीस तपासात पूर्ण सहकार्य करत असून दोषी व्यक्तींविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई व्हावी, यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले. तसेच गैरव्यवहारातून झालेल्या आर्थिक नुकसानीची संबंधितांकडून कायदेशीर मार्गाने वसुली करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, "पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि सभासदांचे हित" हा संस्थेचा मूलमंत्र कायम असून भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी अंतर्गत नियंत्रण व्यवस्था अधिक सक्षम करण्यात आल्याचे संस्थेच्या वतीने प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या