घारगाव : - संगमनेर तालुक्यातील बोटा परिसरात बेकायदेशीर गॅस सिलिंडरची साठेबाजी करणाऱ्यांवर तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाने धडक कारवाई केली आहे. दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून मोठ्या प्रमाणावर अवैध गॅस टाक्या जप्त करण्यात आल्या असून, दोन मुख्य संशयित आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे तालुक्यातील अवैध विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
नुकतीच मुंजेवाडी (अकलापूर) येथे गॅस व्हॉल्व्हमध्ये वॉशर नसल्याने गळती होऊन दिनेश कापसे यांचा संपूर्ण संसार जळून खाक झाला होता. गॅस एजन्सीच्या या निष्काळजीपणाची गंभीर दखल घेत पुरवठा विभाग 'ॲक्शन मोड'मध्ये आला आहे. २९ जून रोजी बोटा येथील जागरूक ग्रामस्थांनी पुरवठा निरीक्षण अधिकारी रसिक रत्नाकर सातपुते यांना बेकायदेशीर साठ्याची गोपनीय माहिती दिली होती. त्यानुसार ३० जून रोजी तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने बोटा येथे दोन ठिकाणी अचानक छापे टाकले.
पहिली कारवाई 'डाळिंब निवास वस्ती' येथे भागचंद भळगट यांच्या घरावर करण्यात आली. तेथे भारत गॅसचे ७ आणि एच.पी. गॅसचे ३ असे एकूण १० अवैध घरगुती सिलिंडर सापडले. याप्रकरणी भागचंद भळगट व त्यांच्या पत्नी रमला भळगट यांच्यावर गुन्हा दाखल झाला.
दुसरी धडक कारवाई 'भळगट वस्ती' येथील अशोक भळगट यांच्या घरावर झाली. येथे व्यावसायिक व घरगुती सिलिंडरचा मोठा साठा आणि ग्राहकांची पासबुके जप्त करण्यात आली. यात भारत गॅसचे ४ व्यावसायिक, २ घरगुती, ७ कमर्शियल सिलिंडर, ६ रेग्युलेटर आणि एच.पी. गॅसचे २ व्यावसायिक, ५ घरगुती सिलिंडर व २ रेग्युलेटरचा समावेश आहे. याप्रकरणी अशोक भळगट व मीनाक्षी पंडित यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
पुरवठा अधिकारी सातपुते यांच्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांत 'अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५' च्या कलम ३(१) आणि ७ अन्वये गुन्हा दाखल झाला असून, जप्त साठा अधिकृत गॅस एजन्सीकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
.jpg)
0 टिप्पण्या