👉
संचालकाला कर्ज मंजूर केल्याप्रकरणी कारवाई; माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना धक्का..!
अहिल्यानगर : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) बँकिंग नियमन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी अहिल्यानगर येथील अशोक सहकारी बँक लिमिटेडवर १० लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे. बँकेने आपल्या संचालक मंडळातील एका सदस्याला कर्ज मंजूर करून बँकिंग नियमन कायदा, १९४९ मधील तरतुदींचे उल्लंघन केल्याचे आरबीआयच्या तपासात आढळून आले. या पार्श्वभूमीवर आरबीआयने आपल्या अधिकारांचा वापर करून ही दंडात्मक कारवाई केली आहे.
आरबीआयने स्पष्ट केले आहे की, हा दंड केवळ नियामक नियमांचे पालन न केल्याबद्दल आकारण्यात आला असून, त्याचा बँकेच्या ग्राहकांशी असलेल्या ठेवी, कर्ज व्यवहार किंवा इतर करारांवर कोणताही परिणाम होणार नाही. ग्राहकांनी याबाबत कोणतीही चिंता करण्याचे कारण नसल्याचेही आरबीआयने म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरबीआयने बँकेच्या तपासणीदरम्यान संचालकांना कर्ज देण्यासंबंधीच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आणले होते. त्यानंतर बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. बँकेने दिलेल्या स्पष्टीकरणाचा विचार केल्यानंतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे आर्थिक दंडाची कारवाई करण्यात आली.
सहकारी बँकिंग क्षेत्रात नियमांचे काटेकोर पालन व्हावे, पारदर्शकता वाढावी आणि ठेवीदारांचा विश्वास अबाधित राहावा, या उद्देशाने आरबीआयकडून वेळोवेळी अशा प्रकारच्या कारवाया करण्यात येतात. त्यामुळे संबंधित बँकांनी नियामक तरतुदींचे पालन करण्याची आवश्यकता पुन्हा अधोरेखित झाली आहे.

0 टिप्पण्या