
जामखेड | प्रतिनिधी- जामखेड पोलिसांनी पहाटेच्या गस्ती दरम्यान धडक कारवाई करत कत्तलीसाठी नेली जात असलेल्या चार गोवंशीय जनावरांची सुटका केली. या कारवाईत टाटा एसीई वाहनासह सुमारे २ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ जुलै रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास जामखेड पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण व गस्त पथक हाळगाव-नान्नज मार्गावर गस्त घालत होते. यावेळी नान्नज पोलीस दुरक्षेत्राच्या हद्दीत संशयास्पद टाटा एसीई (एमएच-१६ डीपी-२८४६) वाहन अडवून तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान वाहनात चार जर्सी जातीच्या गाई अत्यंत दाटीवाटीने व निर्दयीपणे बांधून ठेवण्यात आल्याचे आढळले. चौकशीत ही जनावरे नान्नज येथून केज (जि. बीड) येथे कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याची माहिती समोर आली.
या प्रकरणी तानाजी संभाजी नाईक (रा. खर्डा), सोहेल आझाद कुरेशी (रा. नान्नज) आणि लक्ष्मण बाबासाहेब हाळनवर (रा. मोहरी) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
कारवाईदरम्यान २ लाख रुपये किमतीचे टाटा एसीई वाहन आणि ६० हजार रुपये किमतीच्या चार जर्सी गाई असा एकूण २ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस कॉन्स्टेबल योगेश दळवी यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, १९७६ तसेच प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम, १९६० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार तुकाराम सोनवणे करीत आहेत. या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध गोवंश वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
0 टिप्पण्या