रांजणगाव गणपती:- शिरुर तालुक्यातील करडे गावात मध्यरात्रीच्या सुमारास पिस्तुलातून थेट तीन राऊंड फायर करून एका तरुणाचा खून करण्याचा प्रयत्न झाल्याची अत्यंत गंभीर घटना समोर आली आहे. जुन्या भांडणाच्या कारणावरून सात जणांच्या टोळक्याने बेकायदा जमाव जमवून शिवीगाळ व दमदाटी करत जीवे मारण्याच्या उद्देशाने गोळीबार केल्याची फिर्याद शिरूर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, या प्रकरणातील काही संशयित आरोपींविरोधात यापूर्वी खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी, मारहाण आणि बेकायदा शस्त्र बाळगल्यासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांच्या नोंदीतून स्पष्ट होत आहे. तर काहींच्या विरोधात प्रतिबंधक कारवाईचे प्रस्ताव आणि चॅप्टर केसही दाखल आहेत. तरीही संबंधित व्यक्ती पिस्तुलासह गावात येऊन गोळीबार करण्याइतपत मोकाट कशा फिरत होत्या, हा गंभीर प्रश्न या घटनेनंतर उपस्थित झाला आहे.
हि घटना शनिवार दि. १८ जुलै २०२६ पहाटे सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास करडे येथील हनुमान मंदिराच्या पाठीमागे, भैरवनाथ मंदिराजवळ, स्मशानभूमीशेजारील तळ्याजवळ घडली. या प्रकरणी निखील सतीश थेउरकर, (वय २३), रा. दौडे वस्ती, करडे, ता. शिरुर, जि.पुणे याने शिरुर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी तीन दुचाकींवरून करडे येथील हनुमान मंदिराच्या पाठीमागे, भैरवनाथ मंदिराजवळ येत बेकायदा जमाव जमविला. त्यानंतर फिर्यादीला शिवीगाळ व दमदाटी करून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या दिशेने पिस्तुलातून एकूण तीन राऊंड फायर करण्यात आले. परंतु सुदैवाने या गोळीबारात फिर्यादी जखमी झाला नाही. मात्र भरवस्तीच्या परिसरातील मंदिर आणि स्मशानभूमीजवळ मध्यरात्री झालेल्या या गोळीबारामुळे करडे गावासह संपूर्ण शिरूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
सात जणांविरोधात गुन्हा दाखल...
या प्रकरणी आदित्य लंघे (रा. करडे, शिरुर) सागर ऊर्फ बबलू दत्तात्रय सोनलकर (रा. धायरी परिसर, पुणे) अथर्व ऊर्फ टिन्या रावसाहेब शेळके (रा. रांजणगाव गणपती, शिरुर) दाद्या ऊर्फ रोहन गणेश पंचमुख तसेच अन्य तीन अनोळखी व्यक्तींविरोधात शिरूर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच शस्त्र अधिनियमातील कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
आरोपींची गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी
शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सागर ऊर्फ बबलू सोनलकर याच्याविरोधात शिरूर, हवेली आणि सिंहगड रोड पोलिस ठाण्यांत खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी, जबरी चोरी आणि शस्त्र अधिनियमांतर्गत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तर अथर्व ऊर्फ टिन्या शेळके याच्याविरोधात रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात चोरी, मारहाण आणि शस्त्र अधिनियमांतर्गत अनेक गुन्हे दाखल असल्याची नोंद आहे. त्याच्याविरोधात चॅप्टर केस तसेच महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ५६ अंतर्गत हद्दपारीचा प्रस्तावही असल्याचे सांगण्यात आले आहे.
रोहन पंचमुख याच्याविरोधातही रांजणगाव पोलिस ठाण्यात मारहाण आणि अन्य गंभीर कलमांनुसार गुन्हे दाखल असून प्रतिबंधक कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.
फिर्यादीविरोधातही गंभीर गुन्ह्यांची नोंद
शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निखील थेउरकर याच्या विरोधातही रांजणगाव एमआयडीसी, परभणी ग्रामीण आणि शिरूर पोलिस ठाण्यांत खून, खुनाचा प्रयत्न, शस्त्र अधिनियम, मारहाण आणि बेकायदा जमावासंबंधी गुन्हे दाखल आहेत.
तसेच त्याच्याविरोधात महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ५६ अंतर्गत हद्दपारीचा प्रस्ताव पुणे येथील प्रांत कार्यालयात प्रलंबित असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
त्यामुळे ही घटना दोन गुन्हेगारी गटांतील जुन्या वैमनस्यातून घडली आहे का...? याचा तपास करणे आवश्यक ठरणार आहे. मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींचे गावागावात वाढणारे वर्चस्व आणि हातात सहज उपलब्ध होणारी पिस्तुले ही सामान्य नागरिकांसाठी गंभीर धोक्याची घंटा आहे.
प्रतिबंधक कारवाया फक्त कागदी घोडे ठरत आहेत का...?
या घटनेतील काही आरोपीच्या विरोधात यापुर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. चॅप्टर केस करण्यात आल्या होत्या. हद्दपारीचे प्रस्ताव तयार करण्यात आले होते. तरीही मध्यरात्री तीन दुचाकींवरून टोळके गावात पोहोचते, पिस्तुलातून तीन राऊंड फायर करते आणि घटना घडल्यानंतरही आरोपी, वाहन व शस्त्र पोलिसांच्या हाती लागत नाहीत.हि बाब पोलिस प्रशासनाच्या प्रतिबंधात्मक यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.
प्रतिबंधक कारवाई म्हणजे केवळ प्रस्ताव तयार करून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविणे एवढेच आहे का...? अशा गुन्हेगारांच्या हालचालींवर प्रत्यक्ष नजर ठेवली जात होती का...? त्यांच्या ताब्यात पिस्तुल कोठून आले...? त्यांना शस्त्र पुरवणारी साखळी कोणती...? स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलिस ठाण्याच्या गोपनीय यंत्रणेला या टोळक्याच्या हालचालींची माहिती का मिळाली नाही...? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.
शिरुर तालुक्यात कायदा-सुव्यवस्था धोक्यात...?
गेल्या काही वर्षांपासुन शिरुर तालुक्यात खून, खुनाचे प्रयत्न, धारदार शस्त्रांचे हल्ले, गावठी पिस्तुले, टोळीयुद्ध आणि अवैध धंद्यांच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. एक महिन्यापुर्वी करडे घाटात दोन टोळींच्या गोळीबारात एका सराईत गुन्हेगाराचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता करडे गावात मंदिर परिसरात मध्यरात्री झालेल्या गोळीबारामुळे तालुक्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडत असल्याचा आणखी एक गंभीर इशारा मानला जात आहे.
पोलिसांकडून घटना घडल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया होते; मात्र गंभीर गुन्हे घडण्यापूर्वीच त्यांना रोखण्यासाठी आवश्यक गुप्त माहिती संकलन, गुन्हेगारांवर पाळत, अवैध शस्त्रांचा शोध आणि प्रतिबंधक कारवायांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे का, याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ शिरुर पोलिसांवर आली आहे.
केवळ पोलिसांचा फौजफाटा गावात दाखल करून किंवा हद्दपारीचे प्रस्ताव प्रलंबित ठेवून गुन्हेगारीवर नियंत्रण येणार नाही. संबंधित आरोपींना तातडीने अटक करणे, वापरलेले पिस्तुल व वाहने जप्त करणे, शस्त्र पुरवठ्याचे मूळ शोधणे आणि या घटनेमागील संपूर्ण गुन्हेगारी साखळी उद्ध्वस्त करणे आवश्यक आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास शिरुर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनोद पाटील हे करत आहेत.

0 टिप्पण्या