नाझरे सुपे | प्रतिनिधी- नाझरे धरण परिसरात पावसाने तुरळक हजेरी लावली असली, तरी धरणातील उपयुक्त (लाईव्ह) पाणीसाठ्यात अद्याप कोणतीही वाढ झालेली नाही. शुक्रवारी (दि. ३ जुलै) सकाळी ६ वाजताच्या नोंदीनुसार धरणाची पाणीपातळी ६७०.३६ मीटर असून धरणात एकूण १८२.७२ एमसीएफटी पाणी उपलब्ध आहे. मात्र हे संपूर्ण पाणी मृतसाठ्यात असल्याने उपयुक्त पाणीसाठा शून्य टक्के आहे.
धरणाची एकूण साठवण क्षमता ५.१७४ टीएमसी असून त्यामध्ये २०० एमसीएफटी मृतसाठा आणि ५८८ एमसीएफटी उपयुक्त (लाईव्ह) साठ्याची क्षमता आहे. सध्या लाईव्ह स्टोरेज पूर्णपणे रिकामे असल्यामुळे सिंचनासाठी कालव्यातून पाणी सोडण्यात आलेले नाही. कालव्यातील प्रवाह, जलविमोचकाद्वारे विसर्ग तसेच एकूण पाणी विसर्ग शून्य असल्याची नोंद करण्यात आली आहे.
गेल्या २४ तासांत धरण परिसरात केवळ २.६५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हा पाऊस अत्यल्प असल्याने धरणातील पाणीसाठ्यावर कोणताही सकारात्मक परिणाम झालेला नाही. परिणामी शेतकरी आणि नागरिकांच्या नजरा आता दमदार पावसाकडे लागल्या आहेत. समाधानकारक पाऊस झाल्यानंतरच धरणातील उपयुक्त पाणीसाठ्यात वाढ होऊन सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नाझरे प्रकल्पाचे शाखा अभियंता गणेश गायकवाड, अधिकारी विश्वास पवार तसेच पाटबंधारे विभागाने ही माहिती दिली आहे.

0 टिप्पण्या