श्रीरामपूरमधील वसुली व पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा 'अंधेर कारभार' चव्हाट्यावर !




​निलंबित कर्मचारी कोणासाठी करायचा वसुली : आ. रोहित पवार


​अहिल्यानगर :-भगवान प्रभू श्रीरामांच्या पावन भूमीत म्हणजेच श्रीरामपूर शहरात सध्या वाढत्या गुन्हेगारीसोबतच पोलीस प्रशासनातील अंतर्गत संशयास्पद कारभाराची जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या दोन-तीन आठवड्यांत गोळीबाराच्या चार घटना घडल्या असून एका हॉटेल व्यावसायिकासह दोघांचा खून झाला आहे. या घटनांमुळे व्यापारी आणि जनतेत मोठी दहशत पसरली असून, या वाढत्या गुन्हेगारीला जबाबदार कोण, असा खडा सवाल आ. रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. या गंभीर परिस्थिती विरोधात शहरात सलग चौथ्या दिवशी कडकडीत बंद पाळण्यात आला.
​या संपूर्ण प्रकरणामागे पोलीस प्रशासनातील मोठा गैरकारभार आणि 'वसुलीचा वास' असल्याचा गंभीर आरोप आता समोर येत आहे. नुकताच निलंबित करण्यात आलेला एक पोलीस कर्मचारी नेमका कोणासाठी वसुलीचे (कागद गोळा करण्याचे) काम करत होता, असा थेट सवाल आमदार रोहित पवार यांनी उपस्थित करत प्रशासनाला धारेवर धरले आहे. या निलंबित कर्मचाऱ्याच्या वसुलीच्या मागे नक्की कोणाचा हात आहे, याचा शोध घेण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
​त्याहूनही धक्कादायक बाब म्हणजे, गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला सातत्याने याच भागात नियुक्ती कशी मिळते, हा मोठा प्रश्न आहे. एकाच पोलीस अधिकाऱ्याला ८ ते १० वर्षे या अहिल्यानगर जिल्ह्यात कसे ठेवले जाते आणि त्यांना पुन्हा पुन्हा श्रीरामपूर शहराचाच ताबा कसा दिला जातो, या रहस्यमय बदल्यांवर आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. गुन्हेगारांचा पाठीराखा आणि या बदल्यांमागील सूत्रधार कितीही मोठा असला, तरी त्याचे कंबरडे मोडून श्रीरामपूर भयमुक्त करावे, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या प्रकरणात फिर्यादी व मुख्य संशयित आरोपींची अधिकृत नावे अद्याप प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेली नाहीत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या