श्रीगोंद्यात भावकीच्या वादातून दोन्ही हाताचे पंजे तोडणाऱ्या चौघाजणांना पैठणमध्ये पकडले ; ७ दिवसांची पोलीस कोठडी



श्रीगोंदा  प्रतिनिधी ;- श्रीगोंदा तालुक्यात खळबळ उडवून देणाऱ्या रोहिदास हरिश्चंद्र दांगडे यांच्या दोन्ही हाताचे पंजे तोडून निर्घृण प्राणघातक हल्ला करण्यात आला होता.  या गुन्ह्यातील फरार झालेल्या चौघा आरोपींना पकडण्यात श्रीगोंदा पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. फरारी चौघाजणांना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथून शिताफीने अटक करण्यात आली आहे. चौघा आरोपींना न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, ११ जुलै २०२६ रोजी दुपारी गणपती मळा, सुपेकर वस्ती येथे जुन्या राजकीय व भावकीच्या वादातून रोहिदास दांगडे यांच्यावर धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या अमानुष हल्ल्यात त्यांच्या दोन्ही हातांचे मनगटापासून पंजे तोडण्यात आले होते. या घटनेने संपूर्ण श्रीगोंदा तालुक्यात संतापाची लाट उसळली होती.या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान मुख्य आरोपी परशुराम सुभाष दांगडे, अभयराज संजय दांगडे, सागर सुनील दांगडे आणि तुषार बबन दांगडे (रा. घुगलवडगाव) हे फरार होते.गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे श्रीगोंदा पोलिसांनी पैठण येथे सापळा रचून चौघांनाही जेरबंद केले. आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे . हल्ल्यामागील कट, वापरलेली शस्त्रे आणि इतर सहभागींबाबत आता सखोल चौकशी होणार आहे.पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबुर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुजीतकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे व श्रीगोंदा पोलीस पथकाने ही कारवाई यशस्वी केली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या