सोनई / चांदा - नेवासा तालुक्यातील चांदा येथे अवैध वाळू वाहतुकीवर सोनई पोलिसांनी धडक कारवाई करत ४ लाख १२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत वाळूने भरलेला डंपर ताब्यात घेण्यात आला असून चालक मात्र वाहनातून उडी मारून पसार झाला.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, (दि. २ ),जुलै रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास सोनई पोलीस चांदा–मिरी मार्गावर गस्त घालत होते. त्यावेळी एमएच-१७ एजी-४१७४ क्रमांकाचा डंपर संशयास्पदरीत्या जात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता कोणत्याही वैध परवान्याशिवाय गौणखनिज (वाळू) वाहतूक सुरू असल्याचे निष्पन्न झाले.
या कारवाईत १२ हजार ५०० रुपये किमतीची अडीच ब्रास वाळू आणि ४ लाख रुपये किमतीचा डंपर असा एकूण ४ लाख १२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी वाहन अडविल्यानंतर चालकाने डंपरमधून उडी मारून अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहेत.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल भगवान वाघमोडे यांच्या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २९७/२०२६ अन्वये बीएनएस कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे, पोलीस उपनिरीक्षक किशोर जाधव, पोलीस कॉन्स्टेबल भगवान वाघमोडे व चालक वजीर शेख यांच्या पथकाने केली.
पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्ता गावडे करीत आहेत.

0 टिप्पण्या