महापालिकेच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी; भिंगार कॅम्प पोलिसांत गुन्हा



अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अनधिकृत बांधकामाबाबत महानगरपालिकेकडे तक्रार केल्याच्या कारणावरून महानगरपालिकेच्या सेवानिवृत्त सहाय्यक लेखा अधिकाऱ्याला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी सय्यद हाफिजोद्दीन सय्यद राजा (वय 61, रा. मॉडेल कॉम्प्लेक्स, मुकुंदनगर, अहिल्यानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नुरमोहंमद आबेद शेख ( रा. सहारा सिटी, सीआयव्ही कॉलनी, मुकुंदनगर, अहिल्यानगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सय्यद हाफिजोद्दीन सय्यद राजा हे अहिल्यानगर महानगरपालिकेत सहाय्यक लेखा अधिकारी म्हणून कार्यरत होते. सेवानिवृत्तीनंतर ते समाजकार्यात सक्रिय असून, 2025 सालच्या महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून नगरसेवकपदाची निवडणूकही लढविली होती. त्यानंतर शहरातील नागरिकांच्या विविध समस्या, अनियमितता तसेच बेकायदेशीर कामकाजाविरोधात ते सातत्याने आवाज उठवत असल्याचे त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. मुकुंदनगर परिसरात नुरमोहंमद आबेद शेख यांनी ‘अल नूर’ नावाचे मंगल कार्यालय उभारले असून, त्याचे बांधकाम अनधिकृत असल्याचा आरोप करत सय्यद राजा यांनी यापूर्वी  महानगरपालिकेकडे लेखी तक्रारी सादर केल्या होत्या. या तक्रारींमुळे संबंधितांच्या मनात आपल्याविषयी राग निर्माण झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
घटनेच्या दिवशी, 15 जुलै रोजी दुपारी सुमारे 12.15 वा. च्या सुमारास सय्यद राजा हे मुकुंदनगर परिसरातील बॉम्बे बेकरीजवळून जात असताना त्यांना नुरमोहंमद शेख भेटले .यावेळी शेख यांनी, “तुझ्या तक्रारींमुळे माझ्या मंगल कार्यालयात लोक कार्यक्रमांचे बुकिंग करत नाहीत. त्यामुळे माझे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे,” असे म्हणत सय्यद राजा यांना अश्‍लील शिवीगाळ करून, “तू तक्रार अर्ज मागे घेतला नाहीस तर तुला आणि तुझ्या मुलाला तलवारीने कापून टाकीन,” अशी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. 
या तक्रारीची दखल घेत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात नुरमोहंमद आबेद शेख यांच्याविरुद्ध  अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या