श्रीगोंदा प्रतिनिधी : शाळा आणि महाविद्यालय परिसरात विनाकारण घुटमळत विद्यार्थिनींना त्रास देणाऱ्या टवाळखोरांवर श्रीगोंदा पोलिसांनी बुधवारी धडक कारवाई करत दोन हुल्लडबाज तरुणांना ताब्यात घेतले. या कारवाईमुळे शाळा परिसरात सुरक्षिततेचा संदेश गेला असून पालकांनीही पोलिसांच्या मोहिमेचे स्वागत केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत काही तरुण दुचाकींवरून वारंवार फेऱ्या मारत, मोठ्या आवाजात हॉर्न वाजवत तसेच सायलेन्सरमध्ये बदल करून ध्वनीप्रदूषण करत असल्याच्या तक्रारी पोलीस प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या तक्रारींची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने बुधवारी सकाळी आणि दुपारी साध्या वेशातील महिला पोलीस व अंमलदारांसह शाळा परिसरात सापळा रचला. या कारवाईत शाळेच्या गेटसमोर विनाकारण थांबलेल्या तरुणांची चौकशी करण्यात आली. ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या तसेच सायलेन्सरमध्ये बदल करून मोठा आवाज करणाऱ्या दुचाकींवर कारवाई करण्यात आली. हुल्लडबाजी करणाऱ्या दोन तरुणांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
ताब्यात घेतलेल्या तरुणांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली असून त्यांच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून समुपदेशन करण्यात आले. भविष्यात पुन्हा अशा प्रकारे टवाळखोरी केल्यास थेट न्यायालयीन पातळीवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला.
यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी सांगितले की, "विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. शाळा किंवा महाविद्यालय परिसरात मुलींची छेडछाड, विनाकारण घुटमळणे किंवा हुल्लडबाजी अजिबात खपवून घेतली जाणार नाही. अशा घटना निदर्शनास आल्यास नागरिकांनी किंवा विद्यार्थ्यांनी तातडीने '११२' वर संपर्क साधावा. तक्रारदाराची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल."

0 टिप्पण्या