लिफ्ट देण्याच्या बहाण्याने वृद्धाला लुटले




​घारगाव :-बहिणीकडून घरखर्चासाठी दिलेले पैसे घेऊन पायी जाणाऱ्या एका वृद्धाला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसवून, त्यानंतर धक्काबुक्की करत १५,८०० रुपयांची रोकड लुटल्याची धक्कादायक घटना गुंजाळवाडी शिवार येथे घडली आहे. या प्रकरणी घारगाव पोलिसांनी अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.  
​सारोळे पठार येथील सावळेराम लक्ष्मण घुले हे २९ जून रोजी धांदरफळ येथील मुलीकडून एस.टी. बसने परतत होते. सायंकाळी ४ वाजता साकुर फाटा येथे बसमधून उतरून ते पायी जात असताना, एका अज्ञात दुचाकीस्वाराने "मलाही तिकडेच जायचे आहे" असे सांगून त्यांना विश्वासाने गाडीवर बसवले.  
​गुंजाळवाडी शिवारात आल्यावर चोरट्याने गाडी थांबवून सावळेराम यांना खाली उतरवले व धक्काबुक्की करत त्यांच्या खिशातील १५,८०० रुपये बळजबरीने काढून घेतले. "कोणाला बोलला तर खात्मा करीन," अशी जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार झाला. फिर्यादी गणेश घुले यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या