गृहमंत्रालयाचा आदेश अन् राहुरीतील ३० आरोपींची नाशिक कारागृहात रवानगी



राहुरी   -  गृह मंत्रालय महाराष्ट्र शासन यांच्या आदेशावरून राहुरी सह अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्यातील न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींची नाशिक येथील कारागृहात रवानगी करण्यात आली.  काही दिवसांपूर्वी गृह मंत्रालय महाराष्ट्र शासन यांच्या आदेशानुसार प्रत्येक पोलीस ठाण्यातील उप कारागृहात असलेले न्यायालयीन कोठडीतील आरोपी मोठ्या कारागृहात ठेवण्याच्या प्रक्रियेला सुरूवात करण्यात आली. त्यानुसार राहुरी सह अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्यातील न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींची नाशिक येथील नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात येत आहे. दि. ६ जुलै २०२६ रोजी राहुरी येथील उप कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेले २६ पुरुष व ४ महिला असे एकूण ३० आरोपींची नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. 
          यावेळी पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आरोपींना भेटण्यासाठी नातेवाईकांनी पोलीस ठाण्याच्या आवारात मोठी गर्दी केली होती. तर आरोपी नेत असलेल्या वाहनांमध्ये बंदुकधारी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. राहुरी येथील उप कारागृहात सध्या पोलिस कोठडीतील एकच आरोपी राहिला आहे. काही वर्षापूर्वी राहुरी येथील उप कारागृहातून पाच आरोपी जेलच्या खिडकीचे गज कापून पसार झाले होते. त्यावेळी काही अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. अशा घटना आता होणार नाही. तसेच पोलिस प्रशासनावर असलेला कामाचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या