संगमनेर | प्रतिनिधी- राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राज्यभरात वर्षानुवर्षे कंत्राटी तत्त्वावर सेवा बजावणाऱ्या हजारो आरोग्य कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेमध्ये कायमस्वरूपी सामावून घेण्याचा ऐतिहासिक शासन निर्णय शिवसेना-महायुती सरकारने जाहीर केला असून, या निर्णयाचे आ. अमोल खताळ यांनी शासन दरबारी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानातर्गत कार्यरत असलेले डॉक्टर, परिचारिका आरोग्य कर्मचारी तसेच इतर सर्व कर्मचाऱ्यांनी अनेक वर्षे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही प्रामाणिक पणे आरोग्य सेवा दिली. मात्र, कंत्राटी स्वरूपातील सेवेमुळे त्यांना नोकरीची शाश्वती नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. या सर्वच कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा आणि त्यांना कायमस्वरूपी शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अशी आग्रही मागणी आमदार अमोल खताळ यांनी विधान सभेत वेळोवेळी केली होती. या मागणीची दखल घेत महायुती सरकारने सकारात्मक निर्णय घेतल्यामुळे हजारो आरोग्य कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो आरोग्य कर्मचारी यांच्या रोजगाराला स्थैर्य मिळणार असून त्यांच्या कुटुंबांनाही आर्थिक सुरक्षितता प्राप्त होणार आहे. आरोग्य सेवेतील त्यांचे योगदान लक्षात घेऊन सरकारने घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक असल्याची भावना व्यक्त होत आहे.
"हा केवळ शासन निर्णय नसून आरोग्य सेवेची जबाबदारी निष्ठेने पार पाडणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांच्या कष्टाचा आणि समर्पणाचा सन्मान आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीला न्याय मिळाल्याचा आनंद आहे. गोरगरिब जनतेच्या आरोग्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हातांना बळ देण्याचे काम महायुती सरकारने केले आहे."
अमोल खताळ
आमदार संगमनेर विधानसभा

0 टिप्पण्या