राहुरी : प्रतिनिधी राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा येथे ग्रामपंचायतीच्या नळाला आलेले पिण्याचे पाणी भरण्यासाठी इलेक्ट्रिक मोटार जोडत असताना विजेचा धक्का लागून ५४ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (दि. १ जुलै २०२६) सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भिवा विठ्ठल सुपुत्रे (वय ५४, रा. गोटुंबे आखाडा, ता. राहुरी) यांच्या घरातील इतर सदस्य कामानिमित्त बाहेर गेले होते. दरम्यान, ग्रामपंचायतीच्या नळाला पिण्याचे पाणी आल्यानंतर पाणी भरण्यासाठी त्यांनी इलेक्ट्रिक मोटार जोडण्यास सुरुवात केली. याचवेळी त्यांना विजेचा जोरदार धक्का बसल्याने ते तोंडावर जमिनीवर कोसळले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला.
काही वेळाने शेजारी राहणाऱ्या एका महिलेला भिवा सुपुत्रे हे जमिनीवर पडलेले दिसले. त्यांच्या पायाभोवती विद्युत वायर असल्याचे लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना तातडीने राहुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
या दुर्दैवी घटनेमुळे गोटुंबे आखाडा परिसरात हळहळ व्यक्त होत असून सुपुत्रे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
मयत भिवा विठ्ठल सुपुत्रे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अर्जुन दारकुंडे करीत आहेत.

0 टिप्पण्या