हरेगाव - श्रीरामपूर तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या महांकाळवाडगाव येथील महिलांनी गावात सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीविरोधात आक्रमक पाऊल उचलले आहे. गावातील तब्बल ३० पेक्षा जास्त महिला बचत गटांनी एकत्र येत गावात पूर्ण दारूबंदी करण्यासाठी थेट लढाई पुकारली आहे. यासंदर्भात नुकतीच गावात विशेष ग्रामसभा घेऊन दारूबंदीचा ठरावही एकमताने मंजूर करण्यात आला आहे.महांकाळवाडगावच्या सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आणि महिला भगिनींच्या उपस्थितीत नुकतीच विशेष ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेत गावातील बिघडत चाललेले वातावरण पाहता, गावात दारूविक्री व दारू पिण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात यावी, असा ठराव एकमताने पास करण्यात आला.
महिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, महांकाळवाडगावात सध्या मोठ्या प्रमाणावर आणि उघडपणे अवैध दारूविक्री सुरू आहे. विशेष म्हणजे ही दारूची दुकाने गावाच्या मध्यवस्तीत असल्याने तिथून ये-जा करणाऱ्या महिला आणि तरुण मुलींना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या दुकानांवर तळीरामांची सतत गर्दी असते.
या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी गावातील ३० महिला बचत गटांच्या वतीने श्रीरामपूरचे तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण धनवडे आणि राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे दु.पो.नि. संदिप मांडवेकर यांना लेखी निवेदन देण्यात आले.
प्रशासनाने येत्या ८ दिवसांच्या आत महांकाळ वाडगाव परिसरातील अवैध दारूधंदे व दारूविक्री पूर्णपणे बंद न केल्यास, गावातील महिला कोणतीही पूर्वसूचना न देता उग्र आंदोलन छेडतील, असा स्पष्ट आणि कडक इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या आणि निवेदनावर स्वाक्षऱ्या करणाऱ्या महिलांमध्ये श्रीमती सुनीता वानखेडे, सुलताना बेग, दिपाली महांकाळे, भाग्यश्री महांकाळे, शोभा चोरमल, आरती खुरुद, मिनाज शेख, वंदना महांकाळे, अनिता बडाख, भारती वानखेडे, अर्चना आव्हाड, नीता कुलकर्णी, शीतल पोकळे, मंदा गमे, कल्पना चित्ते, योगिता महांकाळे, हिराबाई बर्डे, लता बर्डे, कुसुम पवार, रविना जाधव, विमल सांगळे, शितल खुरुद, कविता दहिटे, आशा महांकाळे, किर्ती पांढरे, बानो शेख, मनीषा वानखेडे, शितल पवार, जयश्री बनगय्या, लता अहिरे, कावेरी कुलकर्णी, गिता सांगळे, शारदा पवार, राणी पवार यांच्यासह गावातील शेकडो महिलांचा समावेश आहे.
"दारूच्या व्यसनामुळे गावात भांडणे, मारामाऱ्या आणि गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली आहे. तरुण मुले व्यसनाधीन होत असून त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यांचे भवितव्य अंधारात जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे गावाचे सामाजिक स्वास्थ्य आणि वातावरण सुधारण्यासाठी गावात दारूबंदी होणे अत्यंत गरजेचे आहे."
— महांकाळवाडगावातील त्रस्त महिला

0 टिप्पण्या