घरकुलाच्या अनुदानासाठी २० हजारांची लाच; सात्रळ ग्रामपंचायतीतील तिघे एसीबीच्या जाळ्यात






झरेकाठी | प्रतिनिधी- प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलाच्या पुढील अनुदानाचा हप्ता मंजूर करून देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना राहुरी तालुक्यातील सात्रळ ग्रामपंचायतीतील कंत्राटी लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. या प्रकरणात ग्रामविकास अधिकारी व कंत्राटी अभियंत्यालाही आरोपी करण्यात आले असून तिघांविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, सात्रळ ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी हैदर याकुब पटेल (वय ५६), कंत्राटी लिपिक ज्ञानदेव मोहन डुकरे (वय ४३) आणि कंत्राटी अभियंता सचिन हौशीराम  ब्राह्मणे  यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ मधील कलम ७ व १२ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

तक्रारदारास सन २०२३ मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले होते. पहिला १५ हजार रुपयांचा आणि दुसरा ७० हजार रुपयांचा हप्ता मिळाल्यानंतर उर्वरित अनुदान मंजूर करून देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागण्यात आल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर ग्रामविकास अधिकारी पटेल आणि कंत्राटी लिपिक डुकरे यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार एसीबीने मंगळवारी सापळा रचला. यावेळी कंत्राटी लिपिक ज्ञानदेव डुकरे याने तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले.

या व्यवहारासाठी कंत्राटी अभियंता सचिन ब्राह्मणे यांनी डुकरे यास प्रोत्साहन दिल्याचा आरोपही एसीबीने केला आहे.पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सविता तांबे, पोलीस निरीक्षक राजू आल्हाट आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक छाया देवरे करीत आहेत.दरम्यान, शासकीय कामासाठी कोणताही लोकसेवक लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी निर्भयपणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन एसीबीने केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या