अहिल्यानगर लोहमार्ग पोलिसांची डिजिटल अरेस्टबाबत जनजागृती; नागरिकांना सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन


अहिल्यानगर (प्रतिनिधी ) : वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर लोहमार्ग पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक कपिल भालेराव यांनी आपल्या स्टाफसह नागरिकांमध्ये "डिजिटल अरेस्ट" या नव्या प्रकारच्या ऑनलाइन फसवणुकीबाबत जनजागृती केली. यावेळी नागरिकांना सायबर गुन्हेगारांच्या विविध युक्त्या समजावून सांगत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी एपीआय भालेराव यांनी सांगितले की, सायबर गुन्हेगार स्वतःला सीबीआय, ईडी, पोलीस अधिकारी, कस्टम अधिकारी किंवा इतर सरकारी यंत्रणांचे अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांना व्हिडिओ कॉल किंवा फोनद्वारे संपर्क साधतात. तुमच्या नावावर गुन्हा दाखल असल्याचे सांगून भीती निर्माण केली जाते आणि चौकशीच्या नावाखाली बँक खात्यातील पैसे विविध खात्यांमध्ये जमा करण्यास भाग पाडले जाते. यालाच "डिजिटल अरेस्ट" असे म्हटले जाते.पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले की, कोणतीही सरकारी यंत्रणा नागरिकांना फोन किंवा व्हिडिओ कॉलद्वारे अटक करत नाही किंवा बँक खात्यात पैसे जमा करण्याचे आदेश देत नाही. अशा प्रकारचे कॉल आल्यास घाबरून न जाता त्वरित जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा किंवा सायबर हेल्पलाईन क्रमांक १९३० वर तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले.
या जनजागृती मोहिमेदरम्यान रेल्वे प्रवासी, नागरिक तसेच व्यापाऱ्यांना सायबर सुरक्षेबाबत माहितीपत्रके वाटप करण्यात आली. सोशल मीडियावर येणाऱ्या संशयास्पद लिंक, अनोळखी व्यक्तींचे व्हिडिओ कॉल आणि आर्थिक व्यवहारांबाबत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले.
"सायबर गुन्हेगारांच्या भूलथापांना बळी पडू नका, कोणताही संशयास्पद कॉल आल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधा," असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक कपिल भालेराव यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या