प्रांताधिकाऱ्यांच्या तत्परतेने वाचले दोन जखमींचे प्राण

 

श्रीरामपूर | प्रतिनिधी - रामगड परिसरात झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोन व्यक्तींना श्रीरामपूरचे प्रांताधिकारी किरण सावंत-पाटील यांनी तत्परता दाखवत स्वतःच्या शासकीय वाहनातून रुग्णालयात पोहोचवून उपचारासाठी दाखल केले. वेळेत वैद्यकीय मदत मिळाल्याने दोघांचेही प्राण वाचल्याची माहिती समोर आली असून त्यांच्या या संवेदनशील कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

माहितीनुसार, बुधवारी (दि. १) प्रांताधिकारी किरण सावंत-पाटील हे देवळाली प्रवरा येथून निवडणूक कामकाज आटोपून सहकारी स्विप समन्वयक गणेश पिंगळे व संदीप पाळंदे यांच्यासह शासकीय वाहनाने श्रीरामपूरकडे परतत होते. रामगडजवळ एका दुचाकीने सायकलस्वार वृद्धाला धडक दिल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

अपघातात सायकलस्वार वृद्धाचा हात मोडून ते रक्तबंबाळ अवस्थेत पडले होते, तर दुचाकीस्वारही गंभीर जखमी झाला होता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रांताधिकारी सावंत-पाटील यांनी तातडीने वाहन थांबवले. कर्मचारी अक्षय बागडे व गोसावी यांच्या मदतीने दोन्ही जखमींना शासकीय वाहनातून साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रुग्णालयात पोहोचल्यानंतरही त्यांनी डॉक्टरांशी संपर्क साधून तातडीने उपचार सुरू करण्याची व्यवस्था केली. वेळेत उपचार मिळाल्यामुळे दोन्ही जखमींची प्रकृती स्थिर असून मोठा अनर्थ टळला.

या घटनेनंतर नागरिकांनी प्रांताधिकाऱ्यांच्या संवेदनशीलतेचे कौतुक करत, संकटाच्या प्रसंगी दाखविलेल्या तत्परतेमुळे माणुसकीचे जिवंत उदाहरण पाहायला मिळाल्याची भावना व्यक्त केली.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या