बेलापूर बसस्थानकाची दुरवस्था ; 'बहुजन हिताय' ब्रीद ठरतेय फोल!

 

श्रीरामपूर  :  प्रतिनिधी -'बहुजन हिताय, बहुजन सुखाय' हे ब्रीदवाक्य घेऊन धावणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) तालुक्यातील बेलापूर येथील बसस्थानकाची सध्या प्रचंड दुरवस्था झाली आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या स्थानकाला अवकळा आली असून, बेलापूर शहराचे वाढते महत्त्व आणि प्रवाशांची संख्या लक्षात घेता, येथे नवीन अद्ययावत बसस्टॅण्ड उभारण्यात यावे, अशी आग्रही मागणी बेलापूर पंचक्रोशीतील नागरिकांमधून केली जात आहे.

​सध्या हे बसस्थानकच कायमचे बंद करण्याच्या हालचाली प्रशासकीय पातळीवर सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. जर प्रशासनाने असा कोणताही निर्णय घेतला, तर प्रशासनाविरोधात उग्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

​बेलापूर हे केवळ एक गाव नसून आसपासच्या जवळपास १० ते १२ गावांसाठी प्रमुख बाजारपेठेचे ठिकाण आहे. येथे नामवंत शाळा आणि महाविद्यालये असल्याने दररोज हजारो विद्यार्थ्यांची, विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थिनींची येथे मोठी वर्दळ असते. 

​सध्या अस्तित्वात असलेली जागा नवीन बसस्थानकासाठी पुरेशी आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने खालील उपाययोजना कराव्यात,​ परिसरात पसरलेली अस्वच्छता दूर करून तात्काळ स्वच्छता मोहीम राबवावी.​महिला, विद्यार्थिनी आणि पुरुष प्रवाशांसाठी आधुनिक सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्यात यावे.शुद्ध पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी,

 या जागेवर सर्व सोयी-सुविधांनी सज्ज असे नवीन, अद्ययावत बसस्थानक मंजूर करून त्याचे बांधकाम लवकरात लवकर सुरू करावे. बेलापूर परिसराच्या विकासात हे बसस्थानक महत्त्वाचे केंद्र आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अन्यथा नागरिकांच्या असंतोषाचा भडका उडेल, अशी चिन्हे दिसत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या