हातगावात भरदिवसा वृद्ध महिलेचा कान तोडून दागिने पळविले



हातगाव - शेवगाव तालुक्यातील हातगाव येथील मथुराबाई लक्ष्मण काळे ( वय   ७७ ) यांच्या दोन्ही कानातील व गळ्यातील सोन्याचे दागिने भरदिवसा दुपारी २ ते २.३० या दरम्यान  चोरट्यांनी चोरून नेले. या घटनेमुळे हातगाव परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे चोरट्यांनी वृद्ध महिलेचे दोन्ही कान तोडून दागिने चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली.
 त्यांचा मुलगा भारत काळे यांनी माहिती देताना सांगितले आहे की, मी व  माझे कुटुंब आईसह गावालगतच आमच्या शेतात गेली अनेक वर्षापासून राहत असून माझी आई काल गुरुवार रोजी शेवगाव वरुन दुपारच्या एस. टी. बसने २ वाजेच्या दरम्यान हातगावात उतरून आमच्या शेतातील मळ्यात येत असताना घराजवळ  तिला  दोघेजण अनोळखी तरुण दिसले. त्यांना विचारले असता त्यांनी आम्ही या भागात डुकरे आहेत का ? याचा शोध घेत असून त्याचा माग काढत आहोत. असे म्हटल्यानंतर काही क्षणातच त्यांनी लगतच असलेल्या ऊसात आईला ओढत नेत  दोन्ही कानातील व गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबडून नेले. त्यावेळी चोरट्यांना कानातील दागिने सहज काढता आले नाही. त्यावेळी कानातील दागिने काढताना आईचा कान तुटला गेला. ही घटना घडली  त्यावेळी मी घरापासून काही अंतरावरच असणाऱ्या लिंबाच्या झाडाखाली खाटेवर झोपलो होतो . मात्र आरडा - ओरडण्याचा आवाज मला आल्याने मी लगेच उठून घटनेच्या ठिकाणाकडे गेलो असता चोरटे मात्र दागिने ओरबाडून घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले.त्यानंतर मी माझ्या आईला कान जखमी झालेल्या अवस्थेत घेऊन बोधेगाव पोलिस चौकीत गेलो. त्या ठिकाणी असणाऱ्या  पोलिसांना सर्व हकीकत सांगितली. त्या वेळी त्यांनी झालेल्या जखमेवर उपचार करण्यासाठी बोधेगावातील  ग्रामीण रुग्णालयात पाठवले होते. त्यानंतर उपचार घेऊन आम्ही परतलो आहोत असेही काळे यांनी सांगितले आहे.
चौकट - या वेळी चोरट्यांनी गळ्यातील २२ मण्याची सोन्याची मशीनची पोत व  २ सोन्याचे मणी आणि कानातील टाप्स, वेल असा एकूण अंदाजे २ ते अडीच तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरून नेले असल्याचेही सांगण्यात आले आहे.
चौकट - दरम्यान सदर घटनेची माहिती मिळताच बोधेगाव दूरक्षेत्राचे पो. हे. को. सोमीनाथ बांगर व पो. को. नवनाथ कोठे यांनी घटनास्थळी जाऊन सदर घटनेची माहिती घेतली असून चोरट्याचा शोध घेण्यासाठी मोहिम सुरू केली असल्याचे सांगितले आहे. याबाबत सदर महिलेने सांगितले आहे की, मी त्या दोन्हीही चोरट्यांना ओळखले असून त्यांची नावे मात्र मला माहित नसल्याचे म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या