नेवासा : (प्रतिनिधी)- जर्मनी येथे १६ ते २७ जून २०२६ या कालावधीत पार पडलेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत नेवासाफाटा येथील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलातील आंतरराष्ट्रीय नेमबाज वेदांत नितीन वाघमारे याने ५० मीटर 3 पोझिशन रायफल शूटिंग या प्रकारात सांघिक कांस्यपदक जिंकून भारतासह महाराष्ट्र आणि त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलाचा गौरव वाढविला आहे.
विशेष म्हणजे, या यशासह वेदांतने आपल्या अवघ्या सात वर्षांच्या नेमबाजी कारकिर्दीत ५० वे पदक जिंकण्याचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. आतापर्यंत त्याने ९ आंतरराष्ट्रीय, २५ राष्ट्रीय आणि १६ राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये एकूण ५० पदके जिंकून सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीची नोंद केली आहे. त्याची जिद्द, अथक परिश्रम आणि खेळाप्रती असलेले समर्पण यामुळे तो देशातील उदयोन्मुख नेमबाजांपैकी एक म्हणून ओळख निर्माण करत आहे.
या यशाबद्दल त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानच्या अध्यक्षा ॲड. सुमतीताई घाडगे, उपाध्यक्ष ॲड. स्नेहल चव्हाण, सहसचिव डॉ.श्रुती आमले, कार्यकारी अधिकारी डॉ. गौरव आमले, विश्वस्त चेतन चव्हाण, समन्वयक डॉ.अनुराधा गोरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चांगदेव आरसुळे,उपप्राचार्य बर्गे निकिता,प्रा.संतोष जावळे, प्रा.गोरख गुंड, प्रा.सोमनाथ खेडकर, प्रा.अक्षय देवतरसे, प्रा.योगिता गायकवाड, प्रा. अश्विनी औटी, प्रा.भाग्यश्री कोल्हे, प्रा.पल्हारे, प्रा.राहुल बोरुडे, प्रा.प्रविण आवारे, प्रा.मंगेश वैरागर तसेच शिक्षक वाघमारे नितीन, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी वेदांतचे अभिनंदन करून त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
वेदांतला आंतरराष्ट्रीय रायफल शूटिंग प्रशिक्षक छबुराव काळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत असून, त्याच्या यशामागे प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, नियमित सराव आणि कठोर मेहनत हेच प्रमुख आधार असल्याचे मान्यवरांनी सांगितले. जागतिक स्पर्धेतील या यशामुळे नेवासा तालुका, अहमदनगर जिल्हा आणि महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राचा लौकिक उंचावला असून, वेदांतकडून आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धा तसेच ऑलिम्पिकमध्येही उल्लेखनीय कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

0 टिप्पण्या