सोनईतील दुर्दैवी घटना; धोकादायक विद्युत व्यवस्थेविरोधात संताप
शनिशिंगणापूर | प्रतिनिधी - नेवासा तालुक्यातील सोनई येथील हलवाई गल्ली परिसरात लोखंडी सांगाड्यात विद्युत प्रवाह उतरल्याने सात वर्षीय मुलाचा विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (दि. ३०) घडली. या घटनेमुळे सोनई गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत असून वैरागर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मृत मुलाचे नाव ईश्वर उर्फ गोल्या राहुल वैरागर (वय ७, रा. अंबिकानगर, सोनई) असे आहे.मिळालेल्या माहितीनुसार, हलवाई गल्लीतील एका दुकानाचे डेकोरेशनचे काम सुरू असून त्यासाठी लाकडी व लोखंडी सांगाडा उभारण्यात आला होता. या लोखंडी सांगाड्यात विद्युत प्रवाह उतरल्याने शाळेतून घरी आलेला ईश्वर खाऊ घेण्यासाठी दुकानात गेला असता त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. या दुर्घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला.घटना लक्षात येताच कुटुंबीय व स्थानिक नागरिकांनी ईश्वरला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.या हृदयद्रावक घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धोकादायक विद्युत वाहिन्या, उघडे विद्युत जोड आणि बांधकामांवरील तात्पुरत्या वीजजोडण्यांची तातडीने तपासणी करून आवश्यक दुरुस्ती व सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी संबंधित प्रशासनाकडे केली आहे.
.jpg)
0 टिप्पण्या