वैजापूरातील दुर्दैवी घटना; निष्काळजीपणाचा आरोप, महावितरणकडून चौकशीचे आश्वासन
वैजापूर | प्रतिनिधी-वैजापूर शहरातील इंदिरानगर परिसरातील एका मजूर महिलेचा शेतात काम करत असताना लटकत्या वीजतारेचा स्पर्श होऊन जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी दुपारी घडली. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून महावितरणच्या कथित निष्काळजीपणाविरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
मृत महिलेचे नाव कविता संतोष लोधे (वय ३५, रा. इंदिरानगर, वैजापूर) असे आहे. त्या पतीसह मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कविता लोधे या मंगळवारी शहरालगतच्या द्वारका लॉन्स परिसरातील गट क्रमांक १५९/२ मधील शेतात पेरणीच्या कामासाठी गेल्या होत्या. दुपारच्या सुमारास जेवणासाठी उठत असताना शेतात खाली झुकलेल्या उच्चदाबाच्या वीजतारेचा त्यांच्या डोक्याला स्पर्श झाला. विजेचा तीव्र धक्का बसल्याने त्या जागीच कोसळल्या. सहकारी मजुरांनी तातडीने मदतीचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच नातेवाईक, ग्रामस्थ आणि नागरिक मोठ्या संख्येने महावितरण कार्यालयात जमा झाले. लटकत्या वीजतारेची वेळेत दुरुस्ती केली असती तर ही दुर्घटना टळली असती, असा आरोप करत दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची तसेच मृत महिलेच्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली. न्याय मिळाल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका काही काळ नातेवाईकांनी घेतली होती.
दरम्यान, महावितरण विभागाने प्राथमिक माहितीनुसार घटनास्थळी जेसीबीद्वारे नाल्याचे खोदकाम करण्यात आल्याने वीजखांबाचा आधार सैल होऊन वीजतार खाली झुकल्याची शक्यता व्यक्त केली आहे. संबंधित जेसीबी चालकाविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून संपूर्ण घटनेची चौकशी सुरू असल्याचे विभागाने स्पष्ट केले.
या दुर्दैवी घटनेमुळे दोन चिमुकल्या मुलांच्या डोक्यावरून आईचे छत्र हरपले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणातील चौकशी आणि पुढील कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

0 टिप्पण्या