नेवासा : प्रतिनिधी - सत्ताधारी पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याचा राजकीय दबाव धुडकावून लावत अन्न व औषध प्रशासनाच्या महिला अन्न सुरक्षा अधिकारी उज्ज्वला रमन पाटील यांनी नेवासा तालुक्यातील उस्थळ दुमाला येथे प्रतिबंधित मावा विक्रीवर धडक कारवाई केली. कारवाई थांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या संबंधित पदाधिकाऱ्यालाच त्यांनी खडेबोल सुनावत कारवाई पूर्ण केली. याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाला मे. शिवछत्रपती इंटरप्रायजेस येथे प्रतिबंधित मावा विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर दि. २ जुलै रोजी सहाय्यक आयुक्त अ. अ. भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने छापा टाकला. कारवाई सुरू असताना एका स्थानिक पदाधिकाऱ्याने फोन करून दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, "शासकीय कामात अडथळा आणू नका," असे स्पष्ट शब्दांत सुनावत उज्ज्वला पाटील यांनी कारवाई सुरूच ठेवली.
झडतीत गणेश रावसाहेब पिटेकर (वय ३४) हा दुकानात आढळून आला तर दुकानमालक रामकिसन पिटेकर अनुपस्थित होता. दुकानातून ८५० रुपयांचा प्रतिबंधित मावा व कातरलेली सुपारी जप्त करण्यात आली.
याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी उज्ज्वला रमन पाटील यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून संबंधित आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता व अन्न सुरक्षा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दबावाला न झुकता कारवाई करणाऱ्या महिला अधिकाऱ्याच्या भूमिकेचे तालुक्यात कौतुक होत आहे.
.jpg)
0 टिप्पण्या