श्रीरामपूर : तालुक्यातील भामाठाण येथे गोदावरी नदीपात्रातून महसूल पथकाने जप्त केलेल्या २९७ ब्रास वाळूचा सामाजिक उपयोग करत ती गरजू घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाटप करण्यात आली आहे. वाळू चोरीला जाण्याची शक्यता लक्षात घेऊन महसूल प्रशासनाने हा निर्णय घेतल्याची माहिती तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी मिलिंदकुमार वाघ यांनी दिली.महसूल प्रशासनाने केलेल्या कारवाईत ११ जुलै रोजी गोदावरी नदीपात्रातील अनधिकृत वाळूसाठा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर संबंधित वाळू सुरक्षित ठेवण्याऐवजी शासनाच्या लोकहिताच्या धोरणानुसार गरजू घरकुल लाभार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला.
या अंतर्गत हरेगाव ग्रामपंचायतीतील लाभार्थ्यांना ११० ब्रास, दत्तनगर ग्रामपंचायतीतील लाभार्थ्यांना १५२ ब्रास आणि खानापूर ग्रामपंचायतीतील लाभार्थ्यांना ३५ ब्रास, अशी एकूण २९७ ब्रास वाळूचे वाटप करण्यात आले आहे.
याबाबत ग्राम महसूल अधिकारी भामाठाण व खानापूर यांनी सादर केलेल्या अहवालाच्या आधारे ही कार्यवाही करण्यात आली असून, शासनाच्या घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना वेळेत बांधकामासाठी आवश्यक वाळू उपलब्ध झाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयास अहवालाद्वारे कळविण्यात आल्याचे तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी सांगितले.

0 टिप्पण्या