श्रीरामपूरमध्ये बाल तस्करी की भीक मागणारी टोळी? शिवाजी चौकातील 'त्या' घटनेने उडाली खळबळ!



श्रीरामपूर : - शहरातील अत्यंत गजबजलेल्या शिवाजी चौक परिसरात काल घडलेल्या एका संशयास्पद घटनेने श्रीरामपूरकरांना विचार करण्यास भाग पाडले आहे. खांद्यावर निपचित पडलेल्या एका लहान बालकाला घेऊन भीक मागणाऱ्या महिला आणि त्यांचा संशयास्पद वावर यामुळे शहरात बालकांचा गैरवापर करणारी एखादी संघटित टोळी किंवा रॅकेट तर सक्रिय नाही ना? असा गंभीर प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
​काल एका सुजाण नागरिकाला शिवाजी चौक परिसरात दोन महिला भीक मागताना दिसल्या. त्यातील एका महिलेच्या खांद्यावर एक लहान बाळ अत्यंत शांत, निपचित अवस्थेत पडलेले होते. ऐन गर्दीच्या आणि आवाजाच्या ठिकाणीही ते बाळ हालचाल करत नसल्याने त्या नागरिकाला संशय आला. त्यांनी सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी मोबाईलद्वारे फोटो काढण्याचा प्रयत्न केला असता, त्या दोन्ही महिलांनी तातडीने आपले चेहरे लपवले आणि तेथून पळ काढला. महिलांच्या या पळपुटेपणामुळे संशयाची सुई अधिकच बळावली आहे. ते लहान मूल नैसर्गिकरित्या झोपले होते की भीक मागण्यासाठी त्याला कोणतेही अंमली किंवा गुंगीचे औषध देण्यात आले होते? त्याची प्रकृती ठीक आहे का? या महिला खरोखरच हलाखीच्या परिस्थितीत आहेत, की त्यांच्या पाठीमागे लहान मुलांचा वापर करून भीक मागायला लावणारी एखादी मोठी आंतरजिल्हा टोळी कार्यरत आहे? श्रीरामपूरसारख्या मुख्य शहरात दिवसाढवळ्या असे प्रकार घडत असताना पोलीस, स्थानिक प्रशासन आणि बालकल्याण यंत्रणा याकडे डोळेझाक का करत आहेत.​

या घटनेमुळे श्रीरामपूरमधील बालकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. जर संबंधित महिला खरोखरच गरजू असतील, तर त्यांना शासनाच्या विविध योजनांतर्गत मदत मिळणे गरजेचे आहे. मात्र, जर यामागे बालकांचे शोषण किंवा मानवी तस्करीसारखा गंभीर प्रकार असेल, तर अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.श्रीरामपूर पोलीस प्रशासन, महिला व बालविकास विभाग आणि बालकल्याण समितीने या प्रकरणाची तात्काळ दखल घ्यावी. शिवाजी चौक परिसरातील सीसीसीटीव्ही फुटेज तपासून या महिलांचा शोध घ्यावा आणि या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दूध का दूध आणि पाणी का पाणी करावे, अशी तीव्र मागणी आता श्रीरामपूरच्या सुजाण नागरिकांमधून केली जात आहे.

"हा केवळ भीक मागण्याचा विषय नाही, तर एका निष्पाप जीवाच्या सुरक्षिततेचा, आरोग्याचा आणि भविष्याचा प्रश्न आहे."

सुजाण श्रीरामपूरकर नागरिक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या