नेवासा (प्रतिनिधी) : - येथील अस्थिरोग शल्यचिकित्सक व नेवासा मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. किशोरकुमार जयराम गळनिंबकर यांनी स्वतःच्या प्रयत्नातून आणि कोणत्याही शासकीय आर्थिक मदतीशिवाय विकसित केलेल्या 'इंधनशोधक' या भारतातील पहिल्या रिअल-टाइम इंधन उपलब्धता ट्रॅकिंग मोबाईल अॅपचे अधिकृत लोकार्पण राज्याचे जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते मुंबई येथे करण्यात आले.
यावेळी नेवासाचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, नेवासा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. मंत्री विखे पाटील यांनी अॅपचा प्रत्यक्ष वापर करून त्याच्या उपयुक्ततेचे कौतुक करत राज्य शासनाकडून आवश्यक सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
नेवासा येथे आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. गळनिंबकर यांनी सांगितले की, 'इंधनशोधक™' हे अॅप नागरिकांना त्यांच्या परिसरातील पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीची उपलब्धता रिअल-टाइममध्ये दाखवते. त्यामुळे इंधनटंचाईच्या काळात अनावश्यक रांगा टाळून नागरिकांना घरी बसूनच इंधन उपलब्धतेची माहिती मिळू शकते.
या अॅपमध्ये जीपीएस-आधारित नकाशा, सामुदायिक रिपोर्टिंग, पंप मालकांकडून द्विस्तरीय माहिती पडताळणी, संकटकाळातील क्यूआर-आधारित इंधन रेशनिंग व्यवस्था, सरकारी निरीक्षणासाठी डॅशबोर्ड अशा सुविधा उपलब्ध आहेत. हे अॅप १२ भारतीय भाषांमध्ये विकसित करण्यात आले असून देशातील सर्व २८ राज्यांमध्ये विस्तार करण्याची क्षमता असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकल्प स्वयंवित्तपोषित असून त्यासाठी कोणतीही शासकीय गुंतवणूक करण्यात आलेली नाही.
डॉ. गळनिंबकर यांनी अॅपची MSME नोंदणी, भारत सरकारकडील कॉपीराइट नोंदणी तसेच पंतप्रधान कार्यालय, मुख्यमंत्री कार्यालय आणि पेट्रोलियम मंत्रालयाकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावांची माहितीही दिली.
राष्ट्रीय स्तरावर उपयुक्त ठरणार
मार्च ते जून २०२६ दरम्यान होर्मुझ सामुद्रधुनी संकटामुळे देशात अनेक ठिकाणी इंधनटंचाई निर्माण होऊन पेट्रोल पंपांवर मोठ्या रांगा लागल्या होत्या. अशा परिस्थितीत 'इंधनशोधक'सारखे रिअल-टाइम प्लॅटफॉर्म नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतात. या अॅपचा राष्ट्रीय स्तरावर वापर व्हावा, यासाठी केंद्र सरकारच्या संबंधित संस्थांकडे प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती डॉ. गळनिंबकर यांनी दिली.


0 टिप्पण्या