श्रीरामपूर | प्रतिनिधी- तालुक्यातील उक्कलगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या कथित अनधिकृत मुरूम उत्खनन व वाहतुकीमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. जड वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे गावातील अंतर्गत रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून, कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेले रस्ते खराब होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, उक्कलगाव ते खंडाळा मार्गावर दिवस-रात्र विनापरवाना मुरूम वाहतूक सुरू असून, रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत शेकडो वाहने गावातून धावत आहेत. ही वाहतूक अशीच सुरू राहिल्यास सध्या चांगल्या स्थितीत असलेला हा रस्ताही लवकरच खड्डेमय होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, धनवाट रस्ता, जळकेवाडी रस्ता, लमान बाबा रस्ता आणि वाकण वस्ती परिसरातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था आधीच बिकट झाली आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असताना गावातील मुरूम मोठ्या प्रमाणावर बाहेर विकला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
अवैध मुरूम वाहतुकीमुळे पर्यावरणाचे नुकसान होण्याबरोबरच सार्वजनिक मालमत्तेचेही मोठे नुकसान होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या प्रकरणाची महसूल विभाग, पोलीस प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने चौकशी करून अवैध वाहतूक बंद करावी तसेच संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
ग्रामस्थांनी इशारा दिला आहे की, प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल.
ग्रामस्थांची प्रतिक्रिया
"रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर मुरूम वाहतूक होत असल्याने नागरिकांचा त्रास वाढला आहे. गावातील रस्ते उद्ध्वस्त होत आहेत. अवैध उत्खनन आणि वाहतुकीला पाठीशी घालणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे," अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.
.jpg)
0 टिप्पण्या