श्रीरामपूर - महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार आणि ऑपरेटरच्या अक्षम्य हलगर्जीपणाचा एक अतिशय धक्कादायक दुर्देवी आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. बेलापूर येथील महावितरण सबस्टेशन अंतर्गत सुरू असलेल्या फिडरच्या (लाईन) उच्च दाबाच्या वीज प्रवाहाचा जोरदार धक्का लागल्याने, उक्कलगावचे कंत्राटी वायरमन गणेश बाळासाहेब थोरात (वय २८) यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना मंगळवारी (दि. ३० जून) सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, महावितरणच्या कारभारावर आणि सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मयत गणेश थोरात हे गेल्या ११ वर्षांपासून 'प्रथमेश इलेक्ट्रिकल्स, संगमनेर' यांच्यामार्फत बेलापूर महावितरण कंपनीमध्ये कंत्राटी वायरमन म्हणून कार्यरत होते. त्यांच्याकडे उक्कलगाव आणि एकलहरे या दोन्ही गावांची जबाबदारी होती. अत्यंत प्रामाणिक आणि उत्तम कामगिरीमुळे त्यांनी अल्पवधीतच ग्रामस्थांचे मन जिंकले होते.
पाच वर्षांपूर्वीच गणेश यांच्या भावाचे एका दुर्दैवी घटनेत निधन झाले होते. आता गणेश यांच्या जाण्याने या कुटुंबाचा एकमेव कमावता आधार हिरावला गेला आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, चुलते आणि दोन चुलत भाऊ असा परिवार आहे. केवळ एक वर्षापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता, त्यामुळे या घटनेने थोरात कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून गणेश थोरात नेहमीप्रमाणे बेलापूर सबस्टेशन येथे कामावर गेले होते. तेथील एका पोलवर त्यांना दुरुस्तीचे काम करण्यास सांगण्यात आले होते. काम सुरू करण्यापूर्वी गणेश यांनी सबस्टेशनमध्ये हजर असलेला कंत्राटी कर्मचारी व ऑपरेटर भोकरे (रा. वळदगाव) याच्याकडे "किती फिडर चालू आहेत आणि कोणत्या फिडरवर काम करायचे आहे?" याची रीतसर चौकशी केली होती. मात्र, ऑपरेटर भोकरे याने चालू फिडरबाबत कोणतीही स्पष्ट माहिती दिली नाही आणि हलगर्जीपणा केला.
गणेश हे उक्कलगाव फिडर अंतर्गत पोलवर चढून काम करत असतानाच, अचानक चालू फिडरमधील उच्च दाबाच्या वीज प्रवाहाचा त्यांना जोरदार झटका बसला आणि ते थेट खाली कोसळले.नियम पाहता, वीज वाहिनीवर काम करताना अधिकृत 'परमिट' (लाईन बंद असल्याचे सुनिश्चित करणे) घेणे बंधनकारक असते. मयत थोरात याने सगळी पूर्वतयारी केली होती. मागील काळातील
अभियंता वाणी यांच्या कार्यकाळात फिडरची नोंद घेण्यात आली असली, तरी या अपघाताच्या चालू कालावधीची अधिकृत 'परमिट नोंद' गायब करण्यात आल्याचा दाट संशय व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे दुर्घटना घडताच ऑपरेटर भोकरे हा घटनास्थळावरून तातडीने फरार झाला, ज्यामुळे संशय अधिक बळावला आहे. एकाच लाईनवरील फिडर चालु राहिलाच कसा? असा प्रश्न उपस्थित झाला आहेत.
एवढी मोठी आणि जीवघेणी कामगिरी सुरू असताना घटनास्थळावर महावितरणचा एकही जबाबदार अधिकारी किंवा सहाय्यक मदतनीस उपस्थित नव्हता. केवळ कंत्राटी कामगारांच्या भरवशावर हे धोकादायक काम सुरू होते. सकाळी १० वाजता एवढी मोठी दुर्घटना घडलेली असतानाही, कंत्राटी कंपनीचे अधिकारी आणि महावितरणचे वरिष्ठ प्रशासन दुपारी उशिरापर्यंत घटनास्थळी पोहोचले नव्हते. अखेर घटनेच्या सहा तासांनंतर, म्हणजेच दुपारी ४ वाजता पंचनामा करण्यात आला. त्याच्यावर
मंगळवारी सायंकाळी उक्कलगाव येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात गणेश थोरात यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लाडक्या आणि अष्टपैलू वायरमनला अंतिम निरोप देण्यासाठी संपूर्ण परिसर सुन्न झाला होता, तर मोठा जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता. याप्रकरणी आता पोलीस आणि महावितरणचे वरिष्ठ प्रशासन दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून काय कारवाई करणार? की नेहमीप्रमाणे या प्रकरणावर पडदा टाकणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
......
उक्कलगाव ग्रामस्थ आक्रमक;
सबस्टेशनवर ठिय्या!
महावितरणच्या या निष्काळजीपणामुळे एका निष्पाप तरुण वायरमनचा नाहक बळी गेल्याने उक्कलगावचे ग्रामस्थ अत्यंत आक्रमक झाले. संतप्त ग्रामस्थांनी बेलापूर सबस्टेशनवर धाव घेत महावितरण प्रशासनाला धारेवर धरले. जोपर्यंत दोषी ऑपरेटर, कंत्राटदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई होत नाही, तोपर्यंत मागे न हटण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता.
.......
परमिट गायब केल्याचा संशय?
- बेलापूर सबस्टेशनवरील धक्कादायक प्रकार समोर आला असून परमिटची नोंद गायब केल्याचा ग्रामस्थाचा संशय? ग्रामस्थांनी व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे संतप्त आणखी उक्कलगाव ग्रामस्थ आक्रमक झाले होते.

0 टिप्पण्या