शेवगाव प्रतिनिधी : अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथे स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) केलेल्या अवैध गुटखा कारवाईवर संशयाचे सावट निर्माण झाले आहे. पोलिसांनी अधिकृत प्रसिद्धीपत्रकात ५६ हजार ९१२ रुपयांचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा मुद्देमाल जप्त केल्याचे नमूद केले असले, तरी प्रत्यक्षात लाखो रुपयांचा साठा होता आणि कारवाईचे स्वरूप कमी दाखविण्यात आल्याची चर्चा शहरात सुरू आहे. मात्र, या आरोपांना अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
माहितीनुसार, २ जुलै रोजी शेवगाव-दादेगाव मार्गावरील एका ठिकाणी एलसीबीच्या पथकाने छापा टाकून संतोष एकनाथ जाधव (वय ४६, रा. भगतसिंग चौक, शेवगाव) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून हिरा पान मसाला, रॉयल व रत्ना तंबाखू असा एकूण ५६ हजार ९१२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचे पोलिसांनी जाहीर केले आहे.
दरम्यान, स्थानिक स्तरावर या कारवाईबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत. संबंधित ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा असल्याचा दावा काही सूत्रांकडून केला जात असून, प्रत्यक्ष जप्तीपेक्षा कमी मूल्याचा मुद्देमाल दाखविण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. तसेच कारवाईदरम्यान काही प्रभावशाली राजकीय व्यक्तींचा दबाव होता, अशीही चर्चा शहरात सुरू आहे. मात्र, या सर्व दाव्यांना कोणताही अधिकृत पुरावा अथवा पोलिसांकडून पुष्टी मिळालेली नाही.
या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील संबंधित कलमे तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील अवैध व्यवसायांविरोधात कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले असताना या प्रकरणातही सखोल चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. या संपूर्ण प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकारी चौकशी करणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

0 टिप्पण्या