श्रीगोंदा, प्रतिनिधी : काष्टी येथील जनावरांच्या बाजारातून कायदेशीररित्या जनावरे खरेदी करून परतणाऱ्या शेतकऱ्यांना काही तथाकथित गोरक्षकांकडून अडवून मारहाण, दमदाटी तसेच खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप करत, या प्रकाराला आळा घालण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने कृषी उत्पन्न बाजार समितीकडे केली आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
संभाजी ब्रिगेडने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काष्टी येथील जनावरांचा बाजार हा परिसरातील शेतकऱ्यांच्या अर्थकारणाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. मात्र, बाजारातून अधिकृत पावती घेऊन जनावरे घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांची वाहने रस्त्यात अडवून त्यांना त्रास दिला जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.निवेदनात असा दावा करण्यात आला आहे की, देशी गोवंश संरक्षणासंदर्भातील कायद्याचा चुकीचा अर्थ लावून जर्सी, होलस्टीन (HF) व इतर संकरित जातींच्या जनावरांची कायदेशीर वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांवरही दबाव आणला जात आहे. कोणत्याही खासगी संघटनेला वाहने अडविण्याचा किंवा कारवाई करण्याचा अधिकार नसून, संशयास्पद प्रकरणात पोलीस प्रशासनाला माहिती देणे हाच कायदेशीर मार्ग असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी दर शनिवारी काष्टी जनावरांच्या बाजारात दोन पोलीस उपनिरीक्षक (PSI), पाच पोलीस कॉन्स्टेबल आणि दोन महिला पोलीस कॉन्स्टेबल यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त तैनात करावा, प्रत्येक व्यवहार अधिकृत देखरेखीखाली करून पावती द्यावी आणि बाजारातून अधिकृतरीत्या जनावरे घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांना पुढे कोणी अडवून त्रास दिल्यास संबंधितांवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समितीने या विषयाची तातडीने दखल घेऊन पोलीस प्रशासनाकडे प्रभावी पाठपुरावा करावा. अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल आणि त्यातून उद्भवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीस कृषी उत्पन्न बाजार समिती जबाबदार राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

0 टिप्पण्या