अहिल्यानगर:-शहरातील भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका किरकोळ वादाचे पर्यावसान भीषण मारहाणीत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. केकती परिसरातील यशवंतनगर येथील डेअरीफार्म जवळ सोमवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पीडित महिला आपल्या मुलाला सोडण्यासाठी मोपेड दुचाकीवरून जात होती. यावेळी आरोपीने त्याच्या ताब्यातील वाहनाने महिलेच्या गाडीला जोराची धडक दिली. या धडकेनंतर महिलेने आरोपीला 'गाडी व्यवस्थित चालवत जा' असा समजूतदारपणाचा सल्ला दिला. मात्र, या साध्या बोलण्याचा आरोपीला प्रचंड राग आला.
त्यातून चिडलेल्या आरोपीने आणि त्याच्या साथीदारांनी मिळून थेट त्या महिलेच्या कुटुंबाला लक्ष केले. आरोपींनी महिलेच्या पतीला, सासूला आणि सासऱ्यांना रस्त्यावर गाठून अत्यंत गलिच्छ भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. हा वाद एवढ्यावरच थांबला नाही, तर आरोपींनी संपूर्ण कुटुंबाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
या राड्यादरम्यान आरोपीने जवळ असलेला लोखंडी रॉड काढून महिलेच्या पतीवर जबर हल्ला चढवला. या हल्ल्यात पती गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी तातडीने अहिल्यानगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मारहाण केल्यानंतर आरोपींनी पीडित कुटुंबाला जीवे मारण्याची धमकीही दिली.
या प्रकरणी सनी ऊर्फ सूरज ढोबळे, धीरज ढोबळे आणि त्यांच्यासोबत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच साहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात आणि उपनिरीक्षक अकोलकर यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
.jpg)
0 टिप्पण्या