श्रीरामपूरला सुरक्षिततेची नवी ढाल..! व्यापारी-उद्योजकांच्या सुरक्षेसाठी 'बीट इंचार्ज' प्रणाली

 


श्रीरामपूर | प्रतिनिधी - श्रीरामपूर शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर व्यापारी, उद्योजक आणि नागरिकांना मोठा दिलासा देणारा निर्णय जाहीर करत अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांनी शहरात लवकरच 'बीट इंचार्ज' प्रणाली लागू करण्यात येणार असल्याची घोषणा केली. व्यापाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे कटिबद्ध असून, कोणत्याही दबावाखाली नव्हे तर केवळ कायद्याच्या चौकटीत काम केले जाईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तक्रार निवारण दिनानिमित्त आयोजित व्यापारी-उद्योजक संवाद बैठकीत त्यांनी शहरातील विविध व्यापारी संघटना, उद्योग प्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधींशी सविस्तर चर्चा केली. यावेळी आमदार हेमंत ओगले, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, नगराध्यक्ष करण ससाणे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपअधीक्षक जयदत्त भंवर, पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांच्यासह विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत व्यापाऱ्यांनी शहरातील वाढती गुन्हेगारी, अमली पदार्थांचा वाढता विळखा, एमआयडीसी परिसरातील अपुरी पोलीस गस्त, मोबाईल चोरी, वर्गणीच्या नावाखाली होणारी दहशत, अतिक्रमण, जॉगिंग ट्रॅकवरील संशयास्पद हालचाली, मोरगे वस्तीतील चोरीच्या घटना तसेच महाविद्यालयीन युवकांमध्ये वाढलेले ड्रग्जचे व्यसन यांसारख्या गंभीर प्रश्नांकडे पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधले.
यावर उत्तर देताना पोलीस अधीक्षक मुम्मका म्हणाले, "व्यापारी वर्ग हा कोणत्याही शहराच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. व्यापाऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आमची आहे. कोणीही दबाव आणत असेल, दहशत निर्माण करत असेल किंवा तक्रार नोंदवून घेतली जात नसेल तर थेट माझ्याशी संपर्क साधा. प्रत्येक तक्रारीवर कारवाई होईल."

शहरातील प्रत्येक भागाची जबाबदारी निश्चित करण्यासाठी बीट इंचार्ज प्रणाली लागू केली जाणार असून, औद्योगिक क्षेत्र, व्यापारी पेठा आणि संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. शाळा सुरू होण्याच्या व सुटण्याच्या वेळेत विशेष पोलीस गस्त, एमआयडीसीमध्ये नियमित दिवस-रात्र पेट्रोलिंग, ११२ हेल्पलाईनद्वारे तातडीची मदत, तसेच दुकानदारांनी दुकानात दर्जेदार सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
आमदार हेमंत ओगले यांनी पोलीस प्रशासनाच्या अलीकडील कारवाईचे स्वागत करत रेल्वे स्थानक, एसटी स्थानक व इतर संवेदनशील ठिकाणी कायमस्वरूपी पोलीस तपासणी नाके उभारण्याची मागणी केली. व्यापाऱ्यांनीही शहरातील कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी पोलीस प्रशासनाशी समन्वय ठेवण्याची तयारी दर्शविली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या