ममदापूर येथे चोरीचे सत्र थांबेना शेतकऱ्यांच्या मोटार पंप व केबल वायरची चोरी; परिसरात भीतीचे वातावरण

ममदापूर प्रतिनिधी (युनूस इनामदार ):-
राहाता तालुक्यातील ममदापूर परिसरातील कळमकर मळा भागात प्रवरा डाव्या कालव्याच्या कडेला अज्ञात चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या विहिरीवरील पाण्याचे मोटार पंप आणि वीजपुरवठ्याची केबल वायर लांबवल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. वारंवार घडणाऱ्या या चोऱ्यांमुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, परिसरामध्ये भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, ममदापूर परिसरातील गट नं. ४४४ मध्ये रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी विविध शेतांमध्ये प्रवेश केला. चोरट्यांनी विहिरीवरील विद्युत मोटार पंप आणि केबल वायर कापून तीळ लांबवली. सकाळी शेतकरी नेहमीप्रमाणे पिकांना व पिण्याच्या पाण्यासाठी मोटार चालू करण्यासाठी शेतात गेले, तेव्हा हा चोरीचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. महागडे मोटार पंप आणि केबल वायर चोरीला गेल्यामुळे शेतकऱ्यांवर ऐन हंगामात मोठा आर्थिक भार पडला आहे.सिंचनाचा मुख्य स्त्रोतच धोक्यात आल्यामुळे शेतपिकांना पाणी देणे कठीण झाले असून, ऐन पिकांच्या वाढीच्या काळात उभ्या पिकांवर सुकण्याची वेळ आली आहे. परिसरात अशा घटना वारंवार घडत असल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.

​या घटनेची त्वरित माहिती लोणी पोलीस ठाण्याला देण्यात आली असून, पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. सध्या गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

ग्रस्त वाढवावी ; मागणी 
​सदरचे घटनेमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी पोलिस प्रशासनाकडे तातडीने या प्रकरणाचा छडा लावून चोरट्यांना जेरबंद करावे, ग्रामीण भागात आणि शेतशिवारात रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवली. अशा प्रकारच्या चोऱ्या कायमच्या रोखण्यासाठी प्रभावी पावले उचलण्यात यावीत, जेणेकरून शेतकरी सुरक्षितपणे आपला शेती व्यवसाय करू शकतील

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या