राजुरी (प्रतिनिधी. योगेश कडसकर ): देशभक्तीचा उत्साह, तिरंग्याचा अभिमान आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अशा उत्साहपूर्ण वातावरणात श्री यशवंतराव चव्हाण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, राजुरी येथे 80 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करून करण्यात आली. राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करण्यात आले. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी विद्यालयाचा परिसर दुमदुमून गेला.या कार्यक्रमास माननीय मारुती पाटील गोरे, माननीय सुंदरदास रघुनाथ गोरे पाटील, नेत्ररोगतज्ज्ञ, अहिल्यानगर, माननीय डॉ. सोमनाथ गोरे, संचालक पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखाना, माननीय अॅड. सोपान काका गोरे, माननीय शिवाजी गोरे, माननीय संगीता ताई पठारे, सरपंच राजुरी, श्री कदम, ग्रामसेविका माननीय तोडमल मॅडम, माजी मुख्याध्यापक माननीय भाऊसाहेब बेंद्रे, माननीय आप्पासाहेब लाळगे, प्राचार्य संदीप घोडे सर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे सुंदरदास रघुनाथ गोरे पाटील यांनी विद्यालयाच्या ग्रंथालयासाठी तब्बल एक लाख रुपये किमतीची पुस्तके देणगी दिली. त्यांच्या या ज्ञानदानाच्या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.याचबरोबर गरजू व हुशार विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणात अडथळे येऊ नयेत आणि गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.यावेळी मनोगत व्यक्त करताना सुंदरदास गोरे पाटील यांनी आपल्या मातीत आणि समाजात मिळालेल्या संस्कारांचे ऋण व्यक्त केले. “ज्या मातीतून आपण घडलो, त्या मातीला कधीही विसरता कामा नये. ज्या समाजाने आपल्याला घडवले, त्या समाजासाठी आपण काहीतरी देणे लागतो,” या भावनेतून प्रत्येकाने समाजासाठी योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले. शिक्षण, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम घडविण्याचा संदेश त्यांच्या भाषणातून विद्यार्थ्यांना मिळाला.
स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगताना उपस्थित मान्यवरांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करून देशाची एकता, अखंडता, संविधानिक मूल्ये आणि राष्ट्रप्रेम जपण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, भाषणे, कविता, घोषवाक्ये आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा शिक्षक श्री. सुनील गागरे सर, सूत्रसंचालक श्री. शेखर शिंदे, श्री. बाळासाहेब भुसाळ सर, श्री. राऊत मॅडम, श्री. पडवळ सर, ग्रंथपाल श्री. बोर्डे, गाडेकर मॅडम, तुपे मॅडम, म्हस्के मॅडम तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
स्वातंत्र्य दिनाचा हा सोहळा केवळ ध्वजारोहणापुरता मर्यादित न राहता ज्ञानदान, गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात, शिक्षणाचा संस्कार, सामाजिक बांधिलकी आणि मातृभूमीप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा ठरला.
देशभक्तीचा जागर, शिक्षणाचा संस्कार आणि मातीचे ऋण फेडण्याचा संदेश देत श्री यशवंतराव चव्हाण विद्यालय, राजुरी येथे स्वातंत्र्य दिनाचा सोहळा उत्साहात व दिमाखात संपन्न झाला.
0 टिप्पण्या