मोठी कारवाई! श्रीरामपूर न्यायालयाने सुनावली तीन दिवसांची पोलीस कोठडी
श्रीरामपूर | प्रतिनिधी :
ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या हजारो ठेवीदारांची झोप उडवणाऱ्या बहुचर्चित आर्थिक घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेने आणखी मोठी कारवाई करत संचालक अर्चना कुटे (रा. हिरालाल पेठ, बीड) आणि आशा पाटोदेकर (रा. सोलापूर) यांना ताब्यात घेतले आहे. बीड पोलिसांच्या ताब्यात असलेल्या दोघींना न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून अहिल्यानगर आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. त्यानंतर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली.
दोन्ही आरोपींना श्रीरामपूर न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या काळात आर्थिक गुन्हे शाखेकडून घोटाळ्याच्या आर्थिक व्यवहारांचा, ठेवीदारांच्या पैशांचा आणि संचालक मंडळाच्या भूमिकेचा सखोल तपास केला जाणार आहे.
ज्ञानराधा मल्टिस्टेटमध्ये श्रीरामपूर, जामखेड, बीड, छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील हजारो ठेवीदारांचे तब्बल सुमारे चार हजार कोटी रुपये अडकले असल्याचा आरोप आहे. या प्रकरणामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली असून ठेवीदारांमध्ये संतापाची लाट आहे.
श्रीरामपूर येथील ठेवीदारांच्या तक्रारीवरून 29 जुलै 2024 रोजी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात तर जामखेडमधील ठेवीदारांच्या तक्रारीवरून 7 ऑगस्ट 2024 रोजी जामखेड पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. दोन्ही गुन्ह्यांचा तपास सध्या अहिल्यानगर आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून तपास वेगाने सुरू आहे.
यापूर्वीच या प्रकरणात ज्ञानराधा मल्टिस्टेटचा चेअरमन सुरेश कुटे याच्यासह चार जणांना अटक करण्यात आली होती. आता दोन महिला संचालकांनाही अटक झाल्याने तपासाला नवे वळण मिळाले आहे. चौकशीत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.
श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात चेअरमन सुरेश कुटेसह 15 जणांविरुद्ध, तर जामखेड पोलीस ठाण्यात 19 जणांविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. बीड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतही संचालक मंडळाविरुद्ध गुन्हे नोंद असून, आर्थिक गुन्हे शाखेकडून सर्व प्रकरणांचा परस्पर संबंध तपासला जात आहे.
ठेवीदारांचे हजारो कोटी रुपये परत मिळणार का, घोटाळ्यामागील संपूर्ण आर्थिक साखळी उघड होणार का आणि आणखी कोणावर कारवाई होणार, याकडे आता राज्यभरातील ठेवीदारांचे लक्ष लागले आहे.

0 टिप्पण्या