राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत ‘शितल कराटे अकॅडमी’चे दैदिप्यमान यश५ सुवर्ण, ५ रौप्य आणि ९ कांस्यपदकांची कमाई; खेळाडूंचे सर्वत्र कौतुक

छत्रपती संभाजीनगर : गारखेडा स्टेडियम येथे २३ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या राज्यस्तरीय कराटे टूर्नामेंटमध्ये ‘शितल कराटे अकॅडमी’च्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल १९ पदकांची कमाई केली. यामध्ये ५ सुवर्ण, ५ रौप्य आणि ९ कांस्यपदकांचा समावेश असून, या दैदिप्यमान यशामुळे अकॅडमीच्या खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मुख्य प्रशिक्षक शितल जाधव मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली अकॅडमीच्या खेळाडूंनी राज्यस्तरीय स्पर्धेत आपल्या कौशल्याचा, शिस्तीचा आणि आत्मविश्वासाचा दमदार ठसा उमटविला. काता (Kata) आणि कुमिते (Kumite) या दोन्ही प्रकारांत खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांना कडवी झुंज दिली.

पदकविजेत्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

सुवर्णपदक विजेते :
प्रिषा साळवे, रौद्र कर के, इशिका जाधव, वैभव वाणी आणि अभिराज पाचोरे.

रौप्यपदक विजेते :
मयरा नांदेश्वर, शशी धुमाळ, अन्विता शिंदे आणि अभिराज पाचोरे.

कांस्यपदक विजेते :
इशिका जाधव, वैभव वाणी, निब्बान उमाळे, सुजाता खाडे, वेदिका येवले आणि नेत्रा पिनाटे.

विशेष म्हणजे काही खेळाडूंनी एकापेक्षा अधिक प्रकारांत पदकांची कमाई करत आपल्या अष्टपैलू कामगिरीची प्रचिती दिली.

या यशाबद्दल बोलताना प्रशिक्षक शितल जाधव यांनी सांगितले की, “खेळाडूंनी घेतलेली कठोर मेहनत, सातत्यपूर्ण सराव, शिस्त आणि जिद्द यामुळेच राज्यस्तरावर हे यश मिळवता आले. भविष्यातही खेळाडूंनी आणखी मोठी भरारी घ्यावी, यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न राहील.”

राज्यस्तरीय स्पर्धेत मिळवलेल्या या उल्लेखनीय यशामुळे शितल कराटे अकॅडमीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. खेळाडूंच्या या यशाबद्दल अकॅडमीच्या वतीने सर्व पदकविजेत्यांचे अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

या यशामागे खेळाडूंच्या मेहनतीसोबतच पालकांचे प्रोत्साहन आणि सहकार्यही महत्त्वाचे ठरले, याबद्दल अकॅडमीतर्फे सर्व पालकांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले. राज्यस्तरीय व्यासपीठावर मिळवलेले हे यश भविष्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीची नांदी ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या