मोदी–डे वेव्हर शिखर चर्चेत संरक्षण, व्यापार आणि स्वच्छ ऊर्जेवर मोठे करार

 



भारत–बेल्जियम संबंधांना नवी रणनीतिक दिशा; पाच वर्षांत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचे लक्ष्य

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डे वेव्हर यांच्यात गुरुवारी नवी दिल्ली येथे झालेल्या उच्चस्तरीय द्विपक्षीय चर्चेत संरक्षण सहकार्य, व्यापार, स्वच्छ ऊर्जा, सुरक्षा आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांत महत्त्वपूर्ण करार करण्यात आले. संरक्षण सहकार्याबाबतच्या ‘लेटर ऑफ इंटेंट’सह एकूण पाच महत्त्वपूर्ण सामंजस्य करारांमुळे भारत–बेल्जियम संबंधांना नवी रणनीतिक दिशा मिळाल्याचे मानले जात आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, संरक्षण सहकार्याबाबत करण्यात आलेल्या करारामुळे भारताला प्रगत तंत्रज्ञान, तज्ज्ञता आणि युरोपीय संरक्षण पुरवठा साखळीपर्यंत अधिक व्यापक प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. यामुळे देशांतर्गत संरक्षण उत्पादन, तंत्रज्ञान विकास, संयुक्त रचना, सह-विकास, सह-उत्पादन आणि संरक्षण क्षेत्रातील नव्या गुंतवणुकीला चालना मिळणार आहे.

याशिवाय बेल्जियन सिक्युरिटी अँड डिफेन्स इंडस्ट्री असोसिएशन आणि सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्स यांच्यातही सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे भारतीय संरक्षण उत्पादकांना बेल्जियममधील बाजारपेठ, तंत्रज्ञान आणि तज्ज्ञतेपर्यंत सातत्यपूर्ण प्रवेश मिळणार असून, प्रगत संरक्षण उत्पादनाचे स्थानिकीकरण, देशांतर्गत औद्योगिक क्षमता वाढ आणि कुशल रोजगारनिर्मितीला चालना मिळेल. हा करार ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांसाठीही महत्त्वाचा ठरणार आहे.

स्वच्छ ऊर्जा, सायबर गुन्हे आणि राजनैतिक प्रशिक्षणातही सहकार्य

दोन्ही देशांमध्ये नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातही सामंजस्य करार करण्यात आला आहे. भारताच्या स्वच्छ ऊर्जा संक्रमणाला आणि ‘नेट झिरो’ उद्दिष्टांना गती देण्यासाठी बेल्जियम आणि युरोपीय संघासोबत तांत्रिक सहकार्य वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.

आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी आणि सायबर गुन्ह्यांविरोधातील लढा मजबूत करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभाग आणि बेल्जियन फेडरल पोलिस यांच्यातही करार करण्यात आला. वेळेवर गुप्त माहितीची देवाणघेवाण आणि क्षमता वृद्धीच्या माध्यमातून दोन्ही देश सहकार्य करणार आहेत.

तसेच सुषमा स्वराज परराष्ट्र सेवा संस्था आणि बेल्जियमच्या परराष्ट्र विभागामध्ये राजनैतिक प्रशिक्षणासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला असून, संयुक्त प्रशिक्षण पद्धती, अभ्यासक्रम आणि राजनैतिक देवाणघेवाणीला प्रोत्साहन दिले जाणार आहे.

पाच वर्षांत व्यापार दुप्पट करण्याचे लक्ष्य

शिखर चर्चेदरम्यान भारत आणि बेल्जियमने पुढील पाच वर्षांत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचे संयुक्त लक्ष्य निश्चित केले आहे. निर्यात वाढविणे, युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि प्रस्तावित भारत–युरोपीय संघ मुक्त व्यापार कराराशी समन्वय साधणे, यावर दोन्ही देशांचा भर राहणार आहे.

संरक्षण सहकार्याला अधिक बळ देण्यासाठी भारताने ब्रुसेल्समधील भारतीय दूतावासात निवासी संरक्षण अधिकारी नियुक्त करण्याची घोषणा केली. यामुळे संरक्षणविषयक संवाद, संरक्षण उद्योगातील सहकार्य आणि दोन्ही देशांच्या सशस्त्र दलांमधील संबंध अधिक मजबूत होणार आहेत.

परकीय गुंतवणुकीला चालना देण्यासाठी ‘इन्व्हेस्टमेंट फास्ट-ट्रॅक मेकॅनिझम’ स्थापन करण्याचा निर्णयही घेण्यात आला. भारत–बेल्जियम बिझनेस फोरमला संस्थात्मक स्वरूप देण्यासह विद्यार्थी, व्यावसायिक आणि प्रवाशांची गतिशीलता सुलभ करण्यासाठी औपचारिक वाणिज्यदूत संवाद सुरू करण्यावरही सहमती झाली.

‘भारत महत्त्वाचा मित्रदेश’; डे वेव्हर यांचे कौतुक

संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डे वेव्हर यांनी भारताला जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था असल्याचे सांगत भारताचे विशेष कौतुक केले. गेल्या दोन दशकांत भारतामध्ये मोठे परिवर्तन झाल्याचे त्यांनी नमूद केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि बेल्जियममधील समान लोकशाही मूल्ये, मजबूत बाजारपेठीय अर्थव्यवस्था आणि नागरिकांमधील दृढ संबंध यामुळे दोन्ही देश ‘नैसर्गिक भागीदार’ असल्याचे सांगितले.

संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य हे द्विपक्षीय संबंधांचे महत्त्वाचे आधारस्तंभ असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. दोन्ही देशांमध्ये लष्करी देवाणघेवाण आणि प्रशिक्षण सहकार्य वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, संरक्षण उद्योगांमधील करारांमुळे सह-विकास आणि सह-उत्पादनाच्या नव्या संधी निर्माण होतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

बार्ट डे वेव्हर हे बेल्जियमचे पंतप्रधान झाल्यानंतर प्रथमच भारत दौऱ्यावर आले आहेत. तब्बल दोन दशकांनंतर बेल्जियमच्या पंतप्रधानांचा हा भारत दौरा असून, त्यामुळे भारत–बेल्जियम संबंधांच्या नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचे मानले जात आहे. नवी दिल्लीतील कार्यक्रमानंतर ते शुक्रवारी मुंबईला जाणार असून, हिरे, बंदरे आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातील प्रतिनिधींशी ते संवाद साधणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या